कोल्हापूर : गेल्या काही वर्षांत महापालिकेच्या कर वसुलीची गाडी रखडत रखडत सुरू होती; परंतु यंदा पहिल्यांदाच महापालिकेने तब्बल 525 कोटी रुपयांचा विक्रमी महसूल गोळा केला आहे. आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर राबविलेल्या विविध योजना, प्रशासकीय फेरबदल आणि धाडसी निर्णय यांना यश आल्यानेच एवढा महसूल जमा होऊ शकला.
आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी 23 ऑक्टोबर 2023 रोजी कार्यभार स्वीकारल्यानंतर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत 3.5 कोटी खर्चून परीख पूल, चप्पल लाईन, झूम रोड व रिंग रोड क्र. 2 च्या कामांना गती दिली. शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी अमृत 2 योजनेची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. 4 एमएलडी व 6 एलएलडी क्षमतेचे प्रकल्प पूर्ण झाले. 53 टन क्षमतेचा विंड्रो शेड कार्यान्वित झाला आहे. कचरा संकलनासाठी 55 नवीन टिप्पर वाहने घेतली. 20 टन प्रतिदिन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प झाला. दरवर्षी 25 मुलांची विमानवारीद्वारे ‘इस्रो’ सहल आयोजित करण्याचा उपक्रम सुरू केला. नगररचना विभागात ट्रान्सफर प्रक्रिया सुलभ केली. 1000 चौ. मी. पर्यंतच्या पूर्णत्वाचे अधिकार उपशहर रचनाकारांकडे सोपवून प्रलंबित फाईल्सचा निपटारा केला. शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेली टीडीआर प्रक्रिया सोपी, पारदर्शक केली. शहरात हायब—ीड स्मशानभूमी आणि बहुउद्देशीय टँकरची सुविधा उपलब्ध करून दिली. 2019 ते 2026 या काळातील गाळ्यांचे प्रलंबित 49.85 कोटी रुपये भाडे वसूल केले.
केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. विशेष म्हणजे, तालीम संघाकडून अतिरिक्त जागा मिळवून फेज-2 च्या विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा केला. महापालिकेच्या इमारतीसाठी शेंडा पार्क येथे 5 एकर जागा मिळवण्यात यश आले.
रंकाळ्याचा कायापालट
कोल्हापूरचे वैभव असलेल्या रंकाळा तलावाचा कायापालट करण्यावर भर दिला. चौपाटीवर नवीन दिवे, पेव्हमेंट आणि लँडस्केपिंगद्वारे परिसराचा चेहरामोहरा बदलला. रस्ते विकास, कचरा व्यवस्थापन, पर्यटन आणि महसूल वाढ अशा विविध आघाड्यांवर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी प्रभावी कामगिरी केली. त्यांच्या कारकिर्दीत विविध प्रकल्प मार्गी लागले आहेत.