कोल्हापूर : महापालिका चौकात सोमवारी जमलेले फेरीवाले दिवसभर थांबून होते.  (छाया : मिलन मकानदार)
कोल्हापूर

kolhapur | फेरीवाल्यांचा निर्धार... निर्णयाशिवाय महापालिका चाैक सोडायचा नाही

कारवाई केल्‍याने तब्बल पाच तास ठिय्या; जीवाची घालमेल अन् अखेर सुटकेचा निःश्वास

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : महापालिकेने ऐन सणासुदीत रस्त्यावरील फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली. परिणामी, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे सोमवारी (दि. ७) सकाळी एकेक फेरीवाले महापालिका चौकात जमू लागले. त्यांच्या डोळ्यांत उद्याच्या रोजीरोटीची चिंता होती. हातावर पोट असणाऱ्या कष्टकऱ्यांचा निर्धार मात्र पक्का होता, निर्णय झाल्याशिवाय महापालिका चौक सोडायचा नाही.

​दिवसभर ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. मात्र, चौकातील फेरीवाल्यांची अस्वस्थता वाढत होती. एका बाजूला आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आ. राजेश क्षीरसागर, आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड आणि फेरीवाला प्रतिनिधी यांच्यात चर्चांच्या फेऱ्या झडत होत्या; तर दुसऱ्या बाजूला रस्त्यावर बसलेल्या शेकडो कष्टकऱ्यांचे डोळे महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे खिळले होते. ‘आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सुटणार का?’ या विचाराने प्रत्येक मिनिट तासासारखा वाटत होता.

तब्बल पाच तास चौकातच ठिय्या मारून प्रशासकीय संवेदनशीलता ताणून धरली होती. ​अखेर दुपारी साडेतीनच्या सुमारास आ. क्षीरसागर सभागृहातून बाहेर आले. त्यांनी बैठकीतील सकारात्मक निर्णयांची माहिती देताच जमलेल्या कष्टकऱ्यांच्या चेहऱ्यावरील ताण क्षणात वितळला. कोरड्या पडलेल्या ओठांवर हसू उमटले आणि अनेकांनी हात जोडून सुटकेचा निःश्वास टाकला. रोज संघर्षात जगणाऱ्या या फेरीवाल्यांसाठी हा केवळ एका बैठकीचा निकाल नव्हता, तर उद्याची चूल पेटण्याची खात्री होती. फेरीवाल्यांचा हा अनुभव महापालिका चौकाने सोमवारी घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT