kolhapur | नगरपालिका-पंचायतींची 12 हजार कोटींची थकबाकी! 
कोल्हापूर

kolhapur | नगरपालिका-पंचायतींची 12 हजार कोटींची थकबाकी!

उत्पन्नाअभावी पालिका-पंचायती आर्थिकद़ृष्ट्या कमकुवत

पुढारी वृत्तसेवा

सुनील कदम

कोल्हापूर : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींवर स्थानिक करांच्या थकबाकीचा फार मोठा भार पडला आहे. 12 हजार कोटींच्या थकबाकीमुळे या स्थानिक स्वराज्य संस्था आर्थिकद़ृष्ट्या डबघाईला आल्या आहेत. या सगळ्याचा दूरगामी परिणाम नागरी सुविधांवर होताना दिसत आहेत.

राज्यात 226 नगरपालिका आणि 126 नगरपंचायती आहेत. या सर्व पालिका आणि पंचायतींकडे मालमत्ता, घरपट्टी आणि पाणीपट्टी या प्रमुख करांची मिळून जवळपास 12 हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी कित्येक वर्षांपासूनची आहे. गेल्यावर्षी राज्य शासनाने लागू केलेल्या अभय योजनेची सक्षमपणे अंमलबजावणी न झाल्यामुळे ही थकबाकी वसूल होऊ शकलेली नाही. या योजनेच्या अंमलबजावणीचे अधिकार स्थानिक पातळीवर दिले असते तर थकबाकी वसुलीला चांगला हातभार लागला असता.

उत्पन्नाचा मुख्य स्रोत!

नगरपालिका आणि नगरपंचायती यांच्या उतपन्नाचा मुख्य स्रोत हा मालमत्ता, घरपट्टी आणि पाणीपट्टी हा करच आहेत. या करातूनच स्थानिक स्वराज्य संस्था आपापल्या भागात नागरी सुविधा पुरवत असतात; पण गेल्या काही वर्षात उत्पन्नाचा हा स्रोतच कमी झाल्यामुळे राज्यातील पालिका आणि पंचायतींची अवस्था आर्थिकद़ृष्ट्या पंगू झाली आहे. काही ‘संपन्न’ पालिका-पंचायती सोडल्या तर अन्य पालिका-पंचायती स्वनिधीतून नागरी सुविधा पुरविण्यास असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थाकडील थकबाकी वसुलीसाठी काहीतरी कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्याशिवाय राज्यातील पालिका आणि पंचायती आर्थिकद़ृष्ट्या सक्षम होणार नाहीत आणि स्वत:च्या पायावर उभा राहणार नाहीत.

करांच्या थकबाकीमुळे होणारे परिणाम

वर्षांनुवर्षे नगरपालिका - पंचायतींचा विकास खुंटणे

गावात नागरी सुविधांचा पुरता बोजवारा उडणे

नागरी सुविधा मिळत नसल्यामुळे नागरिकांचा रोष

आर्थिकद़ृष्ट्या पालिका, पंचायती पंगू होणे

छोट्या कामांसासाठीही शासनाकडे हात पसरायला लागणे

पालिका-पंचायती क्षेत्राला बकाल स्वरूप येत जाणे

पाणी पुरवठा योजना वर्षांनुवर्षे जुन्याच वापराव्या लागणे

पालिका-पंचायतींकडील थकबाकीची कारणे

कर भरण्याबाबत नागरिकांमध्ये असलेली उदासीनता

कर वसुलीमध्ये होत असलेला राजकीय हस्तक्षेप

कर वसुलीबाबत सत्ताधार्‍यांमध्ये असलेली मतभिन्नता

कर आकारणीत समानता नसल्यामुळे होणारा विरोध

करांच्या तुलनेत सुविधा मिळत नसल्याचा नागरिकांचा आरोप

कर आकारणीच्या दरात प्रशासनाकडून होणारी मनमानी

कर वसुलीबाबत अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ठ होणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT