तानाजी खोत
कोल्हापूर ः मुंबई आणि बंगळूर या दोन महानगरांना जोडणारा 1,000 किमी लांबीच्या औद्योगिक कॉरिडॉरमधील अनेक प्रकल्पांना केंद्रीय अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली असून हा कॉरिडॉर कोल्हापूरसाठी गेमचेंजर ठरणार आहे. या कॉरिडॉरमध्ये महाराष्ट्रातील सातारा आणि कर्नाटकातील धारवाड हे दोन मुख्य ‘नोड्स’ विकसित होत असताना या दोन्हींच्या मध्यभागी असलेले कोल्हापूर इन्फ्ल्युएन्स झोनमध्ये येते.
या योजनेत सातारा आणि धारवाड ही ग््राीनफिल्ड औद्योगिक क्षेत्रे निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार साताऱ्यासाठी 824 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीवरील 913.7 कोटी रुपयांचा सहापदरी उन्नत मार्ग. हा 3.5 कि.मी.चा पूल होणार आहे. यामुळे महापुरावेळीही औद्योगिक कॉरिडॉरमधील माल वाहतूक अखंड सुरू राहणार आहे; तर धारवाडसाठी 530 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
कोकणला औद्योगिक कॉरिडॉरशी जोडण्यासाठी कोल्हापूर-वैभववाडी मार्गासाठी 3,244 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा रेल्वे मार्ग कोल्हापूरला थेट कोकण रेल्वे आणि कोकणातील बंदरांशी जोडेल. यामुळे कॉरिडॉरमधील उत्पादनांची वाहतूक आणि निर्यात वेगाने होईल.
धारवाड मध्ये प्रत्यक्ष उत्पादन सुरू
धारवाडमध्ये जपानी कंपनी ‘निटेक’ ने आपल्या ‘ऑर्चर्ड हब’ या 50 एकरवरील प्रकल्पातून प्रत्यक्ष उत्पादन देखील सुरू झाले आहे. 2023 मध्ये भूमिपूजन झालेल्या या प्रकल्पात वर्षभरात काम पूर्ण होऊन नोव्हेंबर 2025 मध्ये प्रत्यक्ष उत्पादन देखील सुरू झाले असून या कॉरिडॉरमध्ये कर्नाटकने आघाडी घेतल्याचे दिसत आहे. या प्रकल्पात डेटा सेंटर्ससाठी लागणारे भव्य जनरेटर्स, इलेक्ट्रिक वाहनांच्या मोटर्स आणि रिन्युएबल एनर्जीची उपकरणे बनत आहेत. ही उत्पादने केवळ भारतातच नाही, तर अमेरिका आणि युरोपमध्ये निर्यात केली जात आहेत.या संपूर्ण प्रकल्पातून 25 लाख रोजगार निर्मिती अपेक्षित असून, यात बायो फार्मा, ऑटोमोबाईल आणि आयटी क्षेत्रावर विशेष भर दिला जाणार आहे. कोल्हापूरचा ‘इन्फ्ल्युएन्स झोन’ हे विकासाचे मोठे केंद्र ठरणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 आणि दाभोळ येथून निघणाऱ्या गॅस पाईपलाईन आजुबाजूला हा कॉरिडॉर पसरला आहे.
प्रकल्पाची टाईमलाईन
2013-14 : युके सरकारच्या तांत्रिक सहकार्याने या 1,000 किमी लांबीच्या कॉरिडॉरची संकल्पना मांडली.
2019-20 : नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर (NICDC) कडून सातारा आणि धारवाड या दोन प्रमुख ‘नोड्स’च्या मास्टर प्लॅनिंगला मंजुरी.
2024-25 : निटेक या जपानी कंपनीने हुबळी धारवाडच्या कोतुर-बेलूर औद्योगिक क्षेत्रात (कोल्हापूरपासून अवघ्या 150 किमीवर) एक भव्य प्रकल्प उभारला असून उत्पादनाला सुरुवात झाली आहे.
2026 (बजेट 2026-27) : पंचगंगा नदीवरील 913.7 कोटींचा सहा पदरी उन्नत मार्ग आणि लॉजिस्टिक हबसाठी तरतूद.
धारवाडसाठी 530 कोटींची तरतूद.