कोल्हापूर : राज्यातील शहरांवर हवा प्रदूषणाचे सावट गडद होऊ लागले आहे. मुंबईच्या हवेत वाढणाऱ्या प्रदूषणामुळे चिंतेत भर पडली आहे. एक्यूआय संस्थेच्या अहवालानुसार, शनिवारी मुंबईतील हवा निर्देशांकाने २०६ चा टप्पा गाठला. मुंबईसह पुणे, कोल्हापूर, नागपूर, सातारा आणि इतर शहरांमध्ये हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न गंभीर बनत आहे. अंबरनाथमध्ये २०१, जालन्यात १८२, पुण्यात १६७, सोलापूरमध्ये १४६, साताऱ्यात १४५, नागपूरमध्ये १३८, कोल्हापुरात १३७, तर सांगलीत १२६ एक्यूआय नोंदविण्यात आला. शनिवारी जगातील सर्वात प्रदूषित शहर पालघर (एक्यूआय ३४१) होते.
एक्यूआय संस्थेच्या आकडेवारीनुसार, मुंबई, अंबरनाथ आणि जालना येथे हवा गुणवत्ता निर्देशांक १८० च्या पुढे नोंदविण्यात आला, तर पुणे, सोलापूर, सातारा, नागपूर, सांगली आणि कोल्हापूरमध्येही निर्देशांक १०० च्या पुढे आहे. वाहनांचा धूर, औद्योगिक उत्सर्जन, धूलिकण यांसारखे घटक हवेतील प्रदूषणात भर घालू शकतात. या पार्श्वभूमीवर हवेच्या गुणवत्तेवर नियमित लक्ष ठेवणे आणि प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक ठरत आहे.
हवेच्या ढासळत्या गुणवत्तेमागे अल निनोचाही हात
अल निनोच्या प्रभावामुळे वातावरणातील तापमानात यंदा वाढ होत आहे. तसेच पावसाचे प्रमाणही कमी राहिले आहे. अशा परिस्थितीत पावसामुळे हवेतून खाली बसणारी धूळ आणि प्रदूषक कण धुऊन जाण्याचे प्रमाण झाले आहे. त्यातच वाऱ्याचा वेग मंदावल्यास वाहनांचा धूर, औद्योगिक उत्सर्जन आणि सूक्ष्म धूलिकण वातावरणात अधिक काळ टिकून राहू शकतात. परिणामी, हवेची गुणवत्ता खालावण्याची भीती असते.
धुलिकणांमुळे फुप्फुसाचा, हृदयविकार, पक्षाघाताचा धोका
हवेतील सूक्ष्म कण म्हणजेच पार्टिक्युलेट मॅटर (पीएम २.५ आणि पीएम १०) श्वसनावाटे शरीरात प्रवेश करतात. पीएम १० कण नाक, घसा आणि श्वसनमार्गात अडकू शकतात, तर पीएम २.५ हे अतिसूक्ष्म कण फुफ्फुसांच्या आतील भागापर्यंत पोहोचतात. त्यामुळे खोकला, घशात खवखव, दम लागणे आणि दम्याचा त्रास वाढू शकतो. दीर्घकाळ या प्रदूषणामुळे फुफ्फुसांचे कार्य बिघडणे, हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढू शकतो.