Mudaltitta- Nipani, Gargoti- Kolhapur route closed
मुदाळतिट्टा- निपाणी, गारगोटी- कोल्हापूर मार्ग बंद Pudhari Photo
कोल्हापूर

Kolhapur Flood News : मुदाळतिट्टा- निपाणी, गारगोटी- कोल्हापूर मार्ग बंद

पुढारी वृत्तसेवा

मुदाळतिट्टा : प्रा.शाम पाटील

भुदरगड तालुक्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. मुदाळतिट्टा- निपाणी तसेच गारगोटी- कोल्हापूर दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद आहेत. मुरगुडच्या स्मशान शेडजवळ रस्त्यावर चार फुटाच्यावर पाणी आले असून, कूर-मडिलगे दरम्यान रस्त्यावर दोन फुटापेक्षा जास्त पाणी आले आहे. त्यामुळे मुदाळतिट्टा-निपाणी व गारगोटी-कोल्हापूर दोन्ही मार्गावरून होणारी वाहतूक बंद झाली आहे. (Kolhapur Flood News)

मुरगुडचा सर पिराजीराव पूर्ण क्षमतेने भरला असून तलावाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अंदाजे दीड फूट पाणी येथून वाहत असल्याने मुरगूड कापशी वाहतूक बंद झाली आहे. सर पिराजी तलाव क्षेत्रात आज अखेर 46 इंच 70 सेंटी मिटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी याच दिवसापर्यंत 32 इंच 5 सेंट पाऊस नोंद झाला होता. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 14 इंच 65 सेंट पाऊस जादा झाला आहे. गेल्या 24 तासात तीन इंच 45 सेंट इतका पाऊस झाला आहे. करजींवने, अवचितवाडी, पळशिवणे येथील तलाव पूर्ण क्षमतेने भरले असून या तलावांच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे या तीन गावच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.(Kolhapur Flood News)

वेदगंगा नदीच्या महापुराचे पाणी मुरगूड येतील स्मशान शेड पासून ते शिंदेवाडी या गावापर्यंत साधारणता दोन किलोमीटर अंतरावर रस्त्यावर आहे. महापुराच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसत आहे. निढोरी, शिंदेवाडी, मुरगुड येथील पाण्याकाठी असणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.(Kolhapur Flood News)

निढोरी येथील पाच घरांमध्ये वेदगगेच्या महापुराचे पाणी शिरले असून या घरामधील नागरिकांनी संभाव्य धोका ओळखून सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. वेद गंगेच्या महापुराचा वाढता ओघ पाहून निढोरी येथे रेस्क्यू टीम ग्रामपंचायतच्या वतीने तयार करण्यात आली आहे. निढोरी, मुरगूड, शिंदेवाडी, कुर येथे महापूर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली आहे. मुरगुड शहराच्या चारी बाजूला पाणी असल्याने मुरगुड शहराला बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. वाघापूर तालुका भुदरगड येथील बिरदेव मंदिरात चार फुटापर्यंत पाणी आले आहे. सध्या भुदरगडसह मुरगूड परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे.(Kolhapur Flood News)

SCROLL FOR NEXT