Prakash Abitkar | सीपीआरमधील एमआरआय वेटिंग संपणार; नवीन मशिनसह खाटांची क्षमता वाढणार 
कोल्हापूर

Prakash Abitkar | सीपीआरमधील एमआरआय वेटिंग संपणार; नवीन मशिनसह खाटांची क्षमता वाढणार

आरोग्यमंत्री आबिटकर यांची ग्वाही; जानेवारीत शेंडा पार्क येथे ५०० खाटांचे कॅशलेस रुग्णालय

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : सीपीआर येथे ‘एमआरआय’ तपासणीसाठी रुग्णांना महिनाभर प्रतीक्षा करावी लागत असल्याच्या ‘पुढारी’च्या वृत्ताची पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी गंभीर दखल घेतली आहे. रुग्णांची प्रतीक्षा यादी कमी करण्यासाठी सीपीआरमध्ये नवीन एमआरआय मशिनसह अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच शेंडा पार्क येथे जानेवारी महिन्यात ५०० खाटांचे कॅशलेस रुग्णालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सीपीआरमध्ये कोल्हापूरसह सांगली, सातारा आणि कोकणातील रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे बाह्यरुग्ण विभागासह विविध तपासणी विभागांवर मोठा ताण आहे. एमआरआय तपासणीसाठी सातशेहून अधिक रुग्ण प्रतीक्षेत असल्याचे ‘पुढारी’ने १६ नोव्हेंबरच्या अंकात प्रसिद्ध केले होते. ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर आणि कॅज्युअल्टी विभागातही रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री आणि सुविधांमध्ये वाढ करण्यात येणार असल्याचेही मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

जिल्ह्यात आरोग्य सुविधांचा विस्तार

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन शेंडा पार्क येथे १३०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येत आहे. याच परिसरात ५०० खाटांचे सिव्हिल रुग्णालय येत्या १ ते १५ जानेवारीदरम्यान सुरू करण्याचे नियोजन आहे. या रुग्णालयात कॅशलेस उपचारांची सुविधा उपलब्ध होणार आहे. सेवा रुग्णालयातही २०० खाटांचे अद्ययावत रुग्णालय विकसित केले जात आहे. कोल्हापूर हे पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे वैद्यकीय केंद्र बनत आहे. त्यामुळे रुग्णसंख्येच्या प्रमाणात आरोग्य सुविधांची क्षमता वाढविण्यावर शासनाचा भर आहे. सामान्य नागरिकांना दर्जेदार, मोफत आणि वेळेत उपचार मिळावेत, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती आबिटकर यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT