कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला कार्यकर्त्यांनी लागावे, असे आवाहन खासदार शाहू महाराज यांनी शुक्रवारी येथे केले. अजिंक्यतारा येथे झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आणि जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, शिवसेनेचे उपनेते संजय पोवार यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.
शाहू महाराज म्हणाले, चुका सुधारून कार्यकर्त्यांनी महापालिका निवडणूक तयारीला लागावे. आंदोलने, पक्षाचे कार्यक्रम, संवाद, बैठका या माध्यमातून लोकांशी संपर्क ठेवायला हवा. इंडिया आघाडी म्हणून किमान समान कार्यक्रम तयार करूया.
आ. सतेज पाटील म्हणाले, इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांनी त्यांच्या पक्षाच्या बैठका घ्याव्यात. काँग्रेसच्या तालुका पातळीवरील कार्यकर्त्यांच्या बैठका देखील होणार आहेत. दर आठवड्याला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र यावे. मूळ ओबीसींना निवडणुकीत स्थान दिले जाईल. शिवसेनेचे विजय देवणे म्हणाले, शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांच्या कार्यकर्त्यांची मोठी ताकद आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्षांची त्याला चांगली जोड मिळाली आहे. संघटितपणे ताकदीचा वापर केल्यास निवडणुका जिंकणे सोयीचे होणार आहे.
व्ही. बी. पाटील म्हणाले, लोकांच्या प्रश्नांसंदर्भात आंदोलने करू, कार्यकर्त्यांशी संवाद ठेवू, पुढची बैठक राष्ट्रवादीच्या कार्यालयात होईल. त्यामुळे इंडिया आघाडीचे संघटन होईल. माजी आमदार राजू आवळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, दिलीप पोवार यांची भाषणे झाली. यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष आर. के. पोवार, चंद्रकांत यादव, सतीशचंद्र कांबळे, सरलाताई पाटील, भारती पोवार, सुलोचना नायकवडी, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, सुनील मोदी, विशाल देवकुळे आदी उपस्थित होते.
आमदार सतेज पाटील म्हणाले, सध्या महापालिकेच्या विकास योजनेचे काम सुरू असून यामध्ये शहरातील काही विशिष्ट जागेवर आरक्षण टाकणे आणि उठविणे असा काहीजणांचा धंदा सुरू आहे. यासंदर्भात नगररचना विभागाच्या अधिकार्यांना बोलवून ताकीद दिली आहे. त्यावर कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवावे.