कोल्हापूर : शिवसेना ठरावधारकांचा धैर्यप्रसाद हाॅल येथे झालेल्या मेळाव्यात गोकुळची निवडणूक लागली पाहिजे का, बिनविरोध झाली पाहिजे, यावरून खासदार धैर्यशील माने आणि सहयोगी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला. मेळाव्याला आमदार यड्रावकर यांची उपस्थितीही चर्चेची ठरली. यावेळी आ. नरके यांनी विनंतीला मान देऊन मेळाव्यास उपस्थिती लावल्याबद्दल आ. यड्रावकरांचे आभार मानले.
मेळाव्यात बोलताना खा. माने यांनी गोकुळची निवडणूक बिनविरोध होणार या चर्चेवरून ठरावधारक गोंधळात पडलेत. लोकशाही मार्गाने निवडणूक झालीच पाहिजे, असे त्यांचे मत असल्याचे सांगितले. यावर आ. यड्रावकर यांनी गोकुळची निवडणूक लागली तर होणारे अर्थकारण पाहता याचा परिणाम गोकुळवर होईल. त्यामुळे प्रामाणिक दूध उत्पादकांची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशीच इच्छा आहे, अशा शब्दांत खा. माने यांना प्रत्युत्तर दिले.
राजर्षी शाहू आघाडी म्हणून ठराव दाखल केले
नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांनी गोकुळ, जिल्हा बँकेत आम्ही मंत्री मुश्रीफ यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले. मात्र, सोमवारी (दि. २९) शिवसेना मेळाव्यात आ. यड्रावकर यांनी उपस्थिती लावली. त्यांनी आमचे १७० ठराव राजर्षी शाहू विकास आघाडी म्हणून सादर केले. आज आणखी ३५ सादर करणार. आमचे २०५ आणि आबाजींनी पळवलेले २० असे शिरोळमधील २२५ ठराव महायुतीसोबत असल्याचे सांगितले.
नंतर लोहगडला नेऊ नका...
वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर मेळावा घेत एकप्रकारे मतदारांना साकडं घालण्याचा हा मेळावा म्हणावा लागेल. निवडणुकीनंतर त्यांना लोहगडला नेऊ नका म्हणजे झालं, गोकुळमध्ये शेतकर्यांचे कल्याण हा एकच उद्देश असला पाहिजे, असे खा. माने म्हणाले.