सुनील सकटे
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील सिंचन व्यवस्था आणि सुरू असणार्या प्रकल्पांवर देखरेख राहण्यासाठी कोल्हापुरात सुरू झालेल्या जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांचे कार्यालयात पुन्हा पुण्यात स्थलांतरीत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आमदार विजय शिवतारे यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. १ जूनपासून सुरू झालेले कार्यालय अवघ्या तीन महिन्यांत स्थलांतरीत करण्यामागे गौडबंगाल काय? पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील मंत्री, लोकप्रतिनिधी गप्प का? असा संतप्त सवाल केला जात आहे.
जलसंपदा आणि विशेष प्रकल्प अशी दोन मुख्य अभियंता कार्यालये पुण्यात एकाच ठिकाणी कार्यरत होती. प्रकल्पांच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी ज्या भागात प्रकल्पांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, सिंचन व्यवस्था अधिक असलेल्या ठिकाणी कार्यालय स्थलांतरीत करण्याच्या जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निर्णयानुसार पुण्यातील मुख्य अभियंता कार्यालय कोल्हापुरात स्थलांतरीत झाले. हे कार्यालय प्रत्यक्ष १ जूनपासून सुरूही झाले. लाखो रुपये खर्चुन नूतणीकरण केलेल्या कार्यालयाचे मंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. मात्र अवघ्या तीन महिन्यांत स्थलांतरीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत मंत्रालयातील कक्ष अधिकारी मीनाक्षी देशमुख यांनी कृष्णा खोरे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना पत्र दिले आहे.
पत्रात म्हटले आहे की, आमदार शिवतारे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन पुण्यातून सोलापूर व कोल्हापूर येथे हलविण्यात आलेली मुख्य अभियंता कार्यालये पुन्हा पुण्यात स्थलांतरीत करावी, अशी विनंती केली आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी तपासून कार्यवाही करावी, असे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार कक्ष अधिकार्यांनी कार्यकारी संचालकांना पत्र पाठवून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाने जलसंपदा विभागात खळबळ उडाली आहे.
महापुराबाबत निर्णय होणार गतीने
कोल्हापूर, सांगली महापुरावेळी अलमट्टी धरण असो, अथवा विविध धरणांतील पाणी सोडण्याच्या नियोजनासाठी मुख्य अभियंता कार्यालयास संपर्क करावा लागत असे. आता कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता आणि मुख्य अभियंता ही सर्वच कार्यालये कोल्हापुरात असल्याने महापुरावेळी आपत्कालीन स्थितीत निर्णय गतीने होण्यास मदत होणार आहे.