कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी संचालकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. सत्ताधारी आघाडीच्या 17 संचालकांनी गोकुळ निवडणुकीत एकसंध राहण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी त्यांनी जिल्ह्यातील नेत्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे.
‘गोकुळ’मधील माजी आमदार महादेवराव महाडिक, स्व. आमदार पी. एन. पाटील यांची तीन दशकांची सत्ता उलथवून मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांनी सत्ता मिळविली. सत्तांतरानंतर गेल्या चार वर्षांत जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. गत निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्यासोबत असणारे जिल्ह्यातील अन्य नेते महायुतीच्या झेंड्याखाली एकत्र आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांसह सहकारातील निवडणुकाही महायुती म्हणूनच लढण्याचा निर्णय महायुतीच्या नेत्यांनी घेतला आहे. त्यानुसार गोकुळची निवडणूकही महायुती म्हणूनच लढणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.
गोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढल्यास काँग्रेस नेते आ. सतेज पाटील एकाकी पडण्याची शक्यता आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी निवडणूक झाल्यास ती नेत्यांसह उमेदवारांनाही न परवडणारी आहे. संस्थेच्या हितासाठी सत्ताधारी आघाडीच्या 17 संचालकांनी निवडणुकीत पक्षीय राजकारण न आणता एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या प्रयत्नांना कितपत यश येणार हे पुढील काळात स्पष्ट होणार आहे.
बिनविरोधसाठी नेत्यांच्या भेटी सुरू
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संचालकांनी नुकतीच वारणानगर येथे आमदार विनय कोरे यांची भेट घेतली. पुढील टप्प्यात मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार के. पी. पाटील यांची भेट घेणार आहेत. भेटीच्या नियोजनामध्ये माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे नाव नाही. बिनविरोधसाठी त्यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.