कोल्हापूर : बुधवारी पहाटे अवघी 20 दिवसांची चिमुकली ओवी आईच्या दुधासाठी रडायला लागली. लेकीला पोटाशी धरून आई रचनाने तिला दूध पाजले. पोट भरलेली ओवी पुन्हा झोपी गेली. तासाभरानंतर पुन्हा ओवी जागी झाली आणि आईच्या दुधासाठी रडू लागली. यावेळी मात्र आई रचना निपचित पडून होती. बाळ दुधासाठी रडत असतानाच आई रचनाला हृदयविकाराचा झटका आल्याने तिने अखेरचा श्वास घेतला. दुधासाठी कळवळणारी अवघी 20 दिवसांची चिमुकली ओवी आता आईच्या दुधाला कायमची मुकली. रचनाच्या अशा अचानक झालेल्या मृत्यूने सारे घरच सुन्न झाले आहे.
2 जुलै रोजी रचना स्वप्निल चौगले (वय 27) यांना दुसरे कन्यारत्न झाले. पहिली मुलगी स्वरानंतर सात वर्षांनी दुसरी मुलगी झाली. रुग्णालयातून संभाजीनगर परिसरातील जुनी मोरे कॉलनीतील घरी आल्यानंतर रचना यांची तब्येत चांगली होती. गेल्या आठवड्यात थाटामाटात बारसे करून बाळाचे नाव ओवी ठेवले. ओवीच्या आगमनाने चौगले कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मात्र, नियतीने अवघ्या 20 दिवसांत रचनाच्या मृत्यूने हा आनंद हिरावून घेतला. केवळ 20 दिवसांच्या कोवळ्या ओवीने आता आईच्या दुधासाठी कितीही टाहो फोडला तरी आई रचना लेकीची भूक भागवण्यासाठी येणार नाही, या विचाराने कुटुंबातील सर्वांच्या डोळ्यांतून पाण्याची धार वाहत आहे.
बुधवारी, दि. 23 रोजी सकाळी सात वाजता ओवीच्या रडण्याचा आवाज ऐकूनही रचना उठत का नाही, या विचाराने ओवीच्या आजीने रचनाला हाक मारली; मात्र तिचा काहीच प्रतिसाद नव्हता. रचनाच्या हृदयाची धडधड बंद झाली होती आणि शरीर पांढरे पडले होते. रचनाची अवस्था पाहून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. रचनाला उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच रचनाने जीव गमावला होता. रचनाच्या मृत्यूमुळे सात वर्षांची स्वरा आणि 20 दिवसांची ओवी यांचे मातृछत्र हरपले. या घटनेने रचना यांचे पती स्वप्निल यांना धक्का बसला असून, दोन्ही लेकींना पोटाशी कवटाळून बसले होते.
रचना ही आशा स्वयंसेविका म्हणून काम करत होती. 2018 मध्ये रचना आणि स्वप्निल यांचा विवाह झाला होता. स्वप्निल एका खासगी कंपनीत नोकरी करतात. रचनाच्या पश्चात पती, दोन मुली, सासू, सासरे असा परिवार आहे.