कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत अजून अनेक घडामोडी होणार असून, गोकुळचे पाणी अजून फार चढणार आणि उतरणार आहे, असे सूचक वक्तव्य राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी केले. गोकुळची निवडणूक महायुती म्हणूनच लढविणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
गोकुळ निवडणुकीसंदर्भातील दाव्यांवर प्रतिक्रिया देताना मुश्रीफ म्हणाले, अजून निवडणूक जाहीर झालेलीही नाही. त्यामुळे विजयाचे दावे करणे योग्य नाही. पुढील काळात अनेक राजकीय घडामोडी घडतील. हेरे सरंजाम प्रकरणावर बोलताना त्यांनी या प्रश्नाच्या सोडवणुकीचे श्रेय तत्कालीन आमदार स्व. नरसिंगराव पाटील यांना दिले. सातबारा उतारे तयार करण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि महसूल यंत्रणेने मोठे काम केल्याचेही त्यांनी सांगितले.
शेतकरी कर्जमाफीबाबत बोलताना मुश्रीफ यांनी महायुती सरकारने जाहीरनाम्यातील आश्वासन पूर्ण केल्याचा दावा केला. नियमित कर्जफेडीची ३० जून २०२६ ची अट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल, असे ते म्हणाले. कॅगच्या पुरवणी मागण्यांवरील आक्षेपांबाबत विचारले असता, राज्याची आर्थिक स्थिती भक्कम असून विकासकामे आणि शेतकरी कल्याणासाठी कर्ज घेण्यात गैर काही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार आणि महायुतीतील संभाव्य राजकीय समीकरणांबाबत मात्र कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. केडीसीसी बँकेबाबत आमदार शिवाजी पाटील यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना, बँकेचे कामकाज पारदर्शक व प्रामाणिक असल्याचा दावा मुश्रीफ यांनी केला. दरम्यान, गोकुळचे बाप हे स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर हेच आहेत. असा उल्लेखही मुश्रीफ यांनी केला.
गोकुळच्या दुधावरील ग्राहकांचा विश्वास वाढला
राज्यातील भेसळयुक्त दुधावरील कारवाईनंतर गोकुळच्या दुधाची मागणी दीड ते दोन लाख लिटरने वाढली. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचे कौतुक करत मुश्रीफ यांनी भेसळीच्या दुधावर नियंत्रण आल्याने गोकुळच्या दर्जेदार दुधावरील ग्राहकांचा विश्वास वाढल्याचे सांगितले. मात्र वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी दूध संकलन वाढविणे आवश्यक आहे. यासाठी दुधाळ म्हशी खरेदीसाठी गोकुळकडून ५० हजार रुपये आणि केडीसीसी बँकेकडून दिले जाणारे प्रोत्साहन अनुदान १० हजारांवरून २० हजार रुपये करण्याचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.