Speeding Vehicle Accident | भरधाव वाहनाच्या धडकेत मोपेडस्वार जागीच ठार 
कोल्हापूर

Speeding Vehicle Accident | भरधाव वाहनाच्या धडकेत मोपेडस्वार जागीच ठार

मुलीला शाळेत सोडून येताना कोयास्को चौकात दुर्घटना

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : भरधाव वाहनाने जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात सुभाष पांडुरंग गायकवाड (४७, रा. केआयटी कॉलेजजवळ, गोकुळ शिरगाव, ता. करवीर) या मोपेडस्वाराचा मृत्यू झाला. कोयास्को चौक - बी.एस.एन.एल. टॉवरसमोरील रस्त्यावर सोमवारी सकाळी हा अपघात झाला. अपघातानंतर चालक वाहनासह पसार झाला. यावेळी मुलीसह कुटुंबीयांनी केलेला आक्रोश मन हेलावणारा होता.

सुभाष गायकवाड हे खासगी वाहनावर चालक होते. दहावीत शिक्षण घेणाऱ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी सकाळी ते राजारामपुरी येथील माळी कॉलनी येथे गेले होते. मुलीला शाळेत सोडून ते गोकुळ शिरगावकडे जात असताना कोयास्को चौक-बी.एस.एन.एल. टॉवरसमोरील रस्त्यावर भरधाव वाहनाने त्यांना जोरात धडक दिली. चारचाकी वाहनाचे चाक डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.

अपघाताची माहिती मिळताच कुटुंबीय, नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. मुलगी वैष्णवीसह कुटुंबीयांनी केलेला आक्रोश मन हेलावणारा होता. राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक विकास जाधव यांच्यासह वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. राजारामपुरी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या चालकासह वाहनाचा लवकरच छडा लावण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक जाधव यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT