Gokul Election |  
कोल्हापूर

Gokul Election : ‘गोकुळ’च्‍या निवडणुकीचा महिनाभर धुरळा

सत्तेचा संघर्ष तीव्र होणार की सोयीचे राजकारण; आघाड्यांकडे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : ‘गोकुळ’च्‍या निवडणुकीचा आता महिनाभर राजकीय धुरळा उडणार आहे. मंगळवारपासून (दि. १५) उमेदवारी अर्ज दाखल करण्‍यास सुरुवात झाल्‍यानंतर रणधुमाळीला खर्‍या अर्थाने सुरुवात होईल. त्‍यानंतर राजकीय हालचाली गतिमान होणार असून निवडणुकीत होणार्‍या आघाड्यांकडे लक्ष असणार आहे. सद्यस्‍थितीत महायुतींतर्गत उफाळलेला वाद पाहता सत्तेचा संघर्ष तीव्र होणार की, सोयीचे राजकरण करत नेतेमंडळी निवडणूक बिनविरोध करणार, याकडे संपूर्ण जिल्‍ह्याचे लक्ष असणार आहे.

‘गोकुळ’चा निवडणूक कार्यक्रम स्‍पष्‍ट झाल्‍याने आता राजकीय डावपेचांना सुरुवात होईल. ‘गोकुळ’चे माजी संचालक गेल्‍या दोन ते तीन महिन्‍यांपासून संपर्क दौर्‍यावर आहेत. तर, नेत्‍यांकडूनही ठरावधारकांच्‍या गाठीभेटी घेतल्‍या जात आहेत.

महायुती विरुद्ध महाविकास की, धक्‍कादायक आघाड्या?

‘गोकुळ’मध्‍ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत होणार, हे महायुतीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ, खा. धनंजय महाडिक वारंवार सांगत आहेत. मात्र, अंतर्गत वेगळ्या जुळण्‍याही लावल्‍या जात आहेत. नेत्‍यांनी म्‍हटल्‍याप्रमाणे महायुती विरुद्ध महाविकास अशीच निवडणूक होणार की, धक्‍कादायक आघाड्या होणार, हे लवकरच स्‍पष्‍ट होईल.

निवडणूक बिनविरोध होणार?

निवडणूक बिनविरोध होणार, अशीही चर्चा आहे. बिनविरोधची संपूर्ण भिस्‍त ही आ. सतेज पाटील यांच्‍यावर अवलंबून आहे. ठराव दाखल प्रक्रियेदरम्‍यानचे लिलाव पाहता निवडणूक आवाक्‍याबाहेर जाणार आहे. निवडणूक बिनविरोध करण्‍याचादेखील नेत्‍यांचा प्रयत्‍न असणार आहे.

१७५ संस्‍थांना ठरावधारक बदलण्‍यासाठी शुक्रवारपर्यंत मुदत

कार्यक्षेत्राबाहेरील ठरावधारक असलेल्‍या १७५ संस्‍थांना ठरावधारक बदलण्‍यासाठी कोल्‍हापूर सर्किट बेंचने पाच दिवसांची मुदत दिली होती. त्‍यामुळे या संस्‍थांकडून ठरावधारक बदलण्‍यासाठी हालचाली सुरू आहेत. विभागीय उपनिबंधक देविदास मिसाळ यांनी या संस्‍थांना ठरावधारक बदलण्‍यासाठी शुक्रवार (दि. ११) पर्यंतची मुदत दिली आहे. सहायक निबंधक कार्यालयात ठरावधारकांची नावे सादर करण्‍याचे आवाहन मिसाळ यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT