मान्सूनची सुरू असलेली आगेकूच या चित्रात दिसत आहे. Pudhari File Photo
कोल्हापूर

Monsoon News : मान्सून दोन दिवसांत कोल्हापुरात होणार दाखल

यंदा 10 दिवस आधीच जिल्ह्यात पावसाचे आगमन बाष्प भरलेले वारे कोकण व कोल्हापुरावर ओढावल्याने पाच दिवसांपासून धुवाँधार

पुढारी वृत्तसेवा
आशिष शिंदे

कोल्हापूर : जागतिक व प्रादेशिक हवामानाची स्थिती यंदा मान्सूनसाठी पोषक असल्याने केरळमध्ये मान्सूनचे आगमन 8 दिवस लवकर झाले आणि बघता बघता मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला. सध्या मान्सून तळकोकणात आला असून मान्सूनची आगेकूच सकारात्मक आहे. यामुळे यंदा मे महिन्यातच कोल्हापुरात मान्सून दाखल होणार असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. हवामानाची अशीच स्थिती राहिल्यास दोन-तीन दिवसांत मान्सून कोल्हापूरसह राज्याभरात आगेकूच करेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

दरवर्षी मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापुरात पोहोचतो; मात्र यंदा हवामानातील अनुकूल घटकांमुळे तो साधारणतः 10 दिवस आधीच दाखल होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे कोल्हापुरात मे अखेरीसच खर्‍याअर्थाने पावसाळ्याची सुरुवात होणार असल्याची चिन्हे आहेत.

कोल्हापूर व सातार्‍याचा घाटमाथा म्हणजे मान्सूनच्या पावसाला आगेकूच देणारे नैसर्गिक इंजिन समजले जाते. पश्चिमेकडून येणारे वारे जेव्हा घाटावर आदळतात, तेव्हा त्यांना वर ढकलले जाते आणि त्यामुळे ढग उंचीवर जाऊन पाऊस पडतो. यालाच ओरोग्राफिक लिफ्ट म्हणतात. सध्या यामुळेच घाटमाथ्यावर धुवाँधार पाऊस सुरू आहे.

यामुळे मान्सून आला लवकर

एल निनो सदर्न ऑसिलेशन (ईएनएसओ) स्थिती सध्या न्यूट्रल आहे. म्हणजेच एल निनो किंवा ला निनाचा प्रभाव नाही. ही स्थिती सरासरीहून अधिक पावसाला पोषक ठरते. यंदा फेब—ुवारीअखेरच उत्तर भारतात उष्णतेची लाट आली होती. त्यामुळे जमिनीवरचा दाब कमी झाला व हीट लो स्थिती तयार झाली. याशिवाय मे महिन्याच्या सुरुवातीला आलेल्या कमी अक्षांशावरच्या वेस्टर्न डिस्टर्बन्सने हवामानात अधिक हालचाल निर्माण केली. या सर्व कारणांमुळे भारतीय उपखंडात दाबाची तफावत (प्रेशर ग्रॅडियंट) वाढली. परिणामी, अरबी समुद्रावरून येणारे नैर्ऋत्य वारे अधिक वेगाने उत्तर दिशेने सरकत आहेत.

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोल्हापुरात पाच दिवस धुवाँधार

दक्षिण कोकण किनार्‍याजवळ 20 मे रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. 22 मे रोजी कमी दाबाचे क्षेत्र शक्तिशाली बनू लागले (डिप्रेशन) आणि रत्नागिरीच्या किनार्‍याजवळ दोन दिवस स्थिरावले. यामुळे दक्षिण क्वॉर्डंटमध्ये बाष्प भरलेले वारे कोकण व कोल्हापुरात ओढले गेले. त्यामुळे कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT