कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मान्सूनचे वारे दाखल झाले असले, तरी पावसाचा अद्याप पत्ता नाही. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुरू असलेली रिपरिपदेखील आता थांबली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अहवालानुसार शहरात पावसाळ्याच्या पहिल्या १२ दिवसांमध्ये सरासरीच्या ६१ टक्के कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील १२ तालुक्यांत १२ जूनअखेर १४५.२ मिमी सरासरी पावसाच्या तुलनेत केवळ ४३.६ मिमी पाऊस नोंदविला गेला असून, जिल्ह्यात सुमारे ७० टक्के पावसाची तूट आहे.
गेल्या २४ तासांत शहरासह जिल्ह्यातील एकाही तालुक्यात पावसाची नोंद झाली नाही. उलट ढगाळ वातावरणामुळे वाढलेल्या सापेक्ष आर्द्रतेमुळे उकाडा अधीकच जाणवू लागला आहे. शुक्रवारी दैनंदिन सरासरी कमाल तापमानात ३.६ अंशांची वाढ होऊन पारा ३४ अंशांवर स्थिरावला होता. किमान तापमानात २.२ अंशांची वाढ होऊन पारा २४.६ अंशांवर पोहोचला होता. धरण क्षेत्रातही पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली असून केवळ पाटगाव येथे किरकोळ ४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात झालेला पाऊस
(१२ जूनपर्यंत) : 43.6 मि.मी.
शहरात झालेला पाऊस
(१२ जूनपर्यंत) : 34.8 मि.मी.