Indian weather news | यंदा मान्सूनच्या सरासरी पर्जन्यात 6 टक्के घट 
कोल्हापूर

Indian weather news | यंदा मान्सूनच्या सरासरी पर्जन्यात 6 टक्के घट

‘स्कायमेट’चा पहिला अंदाज जाहीर; मान्सूनवर यंदा ‘अल् निनो’चे सावट

पुढारी वृत्तसेवा

राजेंद्र जोशी

कोल्हापूर : हिंदी महासागरात ‘अल् निनो’च्या परिणामाने मान्सूनच्या ढगनिर्मितीमध्ये अडथळा निर्माण होणार असल्याने यंदा मान्सूनमध्ये जून ते सप्टेंबर दरम्यान देशातील एकूण पर्जन्यमान सामान्यापेक्षा सहा टक्क्यांनी कमी राहील. याचा अर्थ यंदा पावसाचे प्रमाण दीर्घकालीन सरासरीच्या (एलपीए) 94 टक्क्यांवर राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने वर्तवला आहे.

या अंदाजानुसार जून ते सप्टेंबर या कालावधीत देशातील सरासरी पर्जन्यमान 817 मिलिमीटर राहण्याची शक्यता आहे. यामध्ये 5 टक्क्यांची त्रुटी मर्यादा असू शकते. या अहवालात देशात दुष्काळसद़ृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता 30 टक्के असून सामान्यापेक्षा कमी पावसाची शक्यता 40 टक्के असल्याचे संस्थेचे मत आहे. देशात अंदमान निकोबार बेटांमध्ये मान्सून हजेरी लावण्यास अद्याप दीड महिन्यांचा कालावधी आहे.

भारतीय हवामान खात्याने अलीकडेच एप्रिल महिन्यात देशात पावसाची शक्यता वर्तविली आहे. भारतात जून महिन्यात 165.3 मिलिमीटर हे सामान्य पर्जन्य समजले जाते. ‘स्कायमेट’च्या अंदाजानुसार जून महिन्यातील पाऊस 101 टक्के इतका राहील. जुलैमधील 280.5 मिलिमीटर ‘एलपीए’च्या तुलनेत हे पर्जन्य 95 टक्क्यांवर येईल; तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पर्जन्याचे प्रमाण सरासरीच्या 92 टक्क्यांवर म्हणजेच सामान्यापेक्षा कमी व सप्टेंबर महिन्यात 89 टक्क्यांवर राहणार आहे.

अर्थव्यवस्थेवर परिणाम नाही, पण...

शेतीचे धोरण ठरविताना पावसाच्या अंदाजाचा आधार महत्त्वाचा ठरतो. पर्जन्य सरासरीपेक्षा 6 टक्क्यांनी कमी असल्याचा अंदाज गृहीत धरला, तर त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार नाही. पण लहरी पर्जन्याने जर अंदाजाला चकवा दिला आणि पर्जन्याचे प्रमाण खूपच खाली राहिले, तर भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा ताण पडू शकतो. कारण मध्य पूर्व आशियामध्ये सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे अर्थव्यवस्थेवर अगोदरच ताण निर्माण झाला आहे आणि शेती उत्पन्नात घट झाली, तर हा ताण वाढू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT