कोल्हापूर : हवामान विभागाच्या मान्सूनची स्थिती दाखवणाऱ्या नकाशात कोल्हापूर जिल्हा मान्सूनने व्यापल्याचे निळ्या रेषांमध्ये दिसत आहे. 
कोल्हापूर

Kolhapur Monsoon Update | जिल्ह्यात मान्सून व्यापला; २४ तासांत सरासरी २१.३ मि.मी. पाऊस बरसला

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यात सर्वत्र सोमवारी मान्सून व्यापला. यामुळे जिल्ह्याच्या सर्वच भागांत रविवारी रात्रीपासून पाऊस सुरू होता. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २१.३ मि.मी.पाऊस बरसला. शिरोळ तालुक्यात सर्वाधिक ४९.६ मि.मी. पावसाची नोंद झाली. कोल्हापूर शहरात २४ मि.मी. पाऊस झाला.

मान्सून शनिवारी चंदगड तालुक्यापर्यंत पोहोचला होता. यानंतर त्याची वाटचाल काहींशी संथ होती. रविवारी तो जिल्ह्यात सर्वत्र पोहोचल्याचे भारतीय हवामान विभागाने अधिकृतपणे जाहीर केले. रविवारी मध्यरात्रीनंतर अनेक भागांत पावसाला सुरुवात झाली. पहाटेपर्यंत पावसाची संततधार सुरू होती. काही धरणक्षेत्रातही पावसाला सुरुवात झाली. जांबरे परिसरात ६२ मि.मी., कोदेत ४७ मि.मी., घटप्रभा ४७, कुंभीत २९ मि.मी., पाटगावमध्ये १८ मि.मी., दूधगंगेत १२ मि.मी. तर चित्री आणि जंगमहट्टीत प्रत्येकी १० मि.मी. पाऊस झाला.

शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत सोमवारी मृगाचा प्रारंभ पावसाच्या हजेरीने झाला. दिवसभर ठिकठिकाणी ढगाळ वातावरण होत होते. काही ठिकाणी हलक्या सरीही कोसळल्या. जिल्ह्यात सकाळी दहा वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत २१.३ मि.मी. इतका पाऊस झाला. यामुळे १ जूनपासून आजअखेर जिल्ह्यात ३९.७ मि.मी.पाऊस झाला. जिल्ह्यात सोमवारी सकाळपर्यंत गेल्या २४ तासांत झालेला पाऊस असा- कंसात मि.मी.मध्ये-हातकणंगले (२१), शिरोळ (४९.६), पन्हाळा (२०.६), शाहूवाडी (१८.६), राधानगरी (७.८), गगनबावडा (६.३), करवीर (१०.२), कागल (१२.३), गडहिंग्लज (३६.५), भुदरगड (११.७), आजरा (२४.२) व चंदगड (२१.४).

आज यलो अलर्ट

जिल्ह्यासाठी मंगळवारी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. जिल्ह्याच्या काही भागांत जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT