कोल्हापूर : शहर, उपनगरात दहशत माजविणार्या आणि खुनाचा प्रयत्न, खंडणी वसुली, जबरी चोरी, अपहरण, दरोड्यासह गंभीर गुन्ह्यांचे पोलिस दप्तरी रेकॉर्ड असलेल्या शाहूपुरी येथील कुख्यात गब्बर टोळीचा म्होरक्या आदित्य ऊर्फ गब्बर अमर सूर्यवंशी याच्यासह सातजणांवर ‘मोका’अंतर्गत कारवाईचा बडगा उगारण्यात आला. टोळीविरोधात प्रस्तावाला विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी शुक्रवारी मंजुरी दिली. टोळीतील सहा साथीदारांच्या विशेष पथकाने तातडीने मुसक्या आवळल्या.
म्होरक्या आदित्य ऊर्फ गब्बर सूर्यवंशी (रा. नागाळा पार्क, कोल्हापूर), अनिकेत अमर सूर्यवंशी (केव्हीज पार्क, नागाळा पार्क), तुषार सिद्धू कुमठे (शाहू कॉलेजसमोर सदर बाजार, कोल्हापूर), सुजल युवराज ढेरे (न्यू पॅलेस, पाटील मळा, कोल्हापूर), ओंकार कुमार समुद्रे (सदर बाजार, विचारे माळ, कोल्हापूर), प्रतीक विजय नागावकर (सदर बाजार, कोल्हापूर) अशी ‘मोका’अंतर्गत कारवाई झालेल्यांची नावे आहेत. याशिवाय एका अल्पवयीन संशयितावरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
कावळा नाका परिसरातील श्रीनाथ गंगाराम कुचकोरवी (28) याच्यावर 22 जून 2025 रोजी नागाळा पार्क येथील महाविद्यालयाजवळ धारदार तलवारीने जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न केला होता. दमदाटी, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकीही दिली. कुचकोरवी यांच्या फिर्यादीनुसार शाहूपुरी पोलिसांनी टोळीला गजाआड करून ‘मोका’अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्याकडे दाखल केला होता. या टोळीविरुद्ध खुनाचा प्रयत्न,जबरी चोरी, दरोडा, फौजदारी पात्र,न्यास भंग, प्राणघातक शस्त्रांसह सार्वजनिक ठिकाणी गर्दी मारामारी, विनयभंग, अवैध जुगार आदी 21 गुन्ह्यांचे रेकॉर्ड असल्याचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले.
टोळीचा म्होरक्या आदित्य ऊर्फ गब्बरसह गुन्हेगारानी श्रीनाथ कुचकोरवी यांना धमकावले होते. आमचा भाई गब्बर सूर्यवंशी यास काय बोललास, तू सूर्यवंशी गँगला ओळखत नाहीस काय, आमची कोल्हापुरात दहशत आहे हे तुला माहीत नाही काय, आमच्या नादाला कोणी लागत नाही लक्षात ठेव, असे बजावत त्याच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला होता.