कोल्हापूर : खून, मारामारी, खंडणीसह गंभीर गुन्हे दाखल असलेल्या राजेंद्रनगरमधील कुख्यात गवळी गँगवर गुरुवारी ‘मोका’अंतर्गत कारवाई केली. टोळीचा म्होरक्या त्र्यंबक गवळीसह नऊ जणांवरील कारवाईस विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी मंजुरी दिली.
त्र्यंबक वसंत गवळी (वय ३९), श्रीमंत वसंत गवळी (४६), अमित हणमंत गवळी, सुमित हणमंत गवळी, सलीम दाऊद अफखान, सोन्या ऊर्फ अविनाश विश्वास जगधने, कार्तिक राजू भालकर (सर्व रा. राजेंद्रनगर), शुभम ऊर्फ अक्षय अनिल मोळे (२८, रा. मंगेशकरनगर, मंगळवार पेठ), सचिन मुकुंद कांबळे ऊर्फ टिंग्या (२७, रा. कंदलगाव) यांच्यावर कारवाई केली. राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक विकास जाधव यांनी ऑगस्ट महिन्यात गवळी गँगविरोधात ‘मोका’चा प्रस्ताव पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्याकडे पाठविला होता. प्रस्तावातील त्रुटी दूर करून विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे मंजुरीसाठी पाठविला.
४३ गुन्हे दाखल
गवळी गँगविरोधात लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, करवीर, गगनबावडा, कासेगाव या पोलिस ठाण्यांत ४३ गुन्हे दाखल आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, विनयभंग, चोरी, धमकावून घर बळकावणे, जातीय तेढ, हत्यार बाळगणे, अमली पदार्थांची विक्री अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत.
‘खून का बदला खून’
कुमार गायकवाड खून प्रकरणातील संशयित रवि कांबळे याच्यावर त्र्यंबक गवळीसह त्याच्या साथीदारांनी ऑगस्ट महिन्यात हल्ला केला होता. या प्रकरणी त्र्यंबकसह नऊ जणांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली होती. याच कारवाईनंतर ‘मोक्का’चा प्रस्ताव पाठविला.