उजळाईवाडी : कोल्हापूर विमानतळावर विमान कोसळल्याचा संदेश आला अन् सर्व संबंधित यंत्रणांची धावपळ उडाली. घटनास्थळी धाव घेत तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली अन् ते मॉकड्रिल असल्याचे स्पष्ट होताच सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
अहमदाबाद विमानतळावरील एअर इंडियाच्या विमानाचा दुर्दैवी अपघात झाला. यानंतर देशातील सर्व विमानतळांवर एअरपोर्ट इमर्जन्सी मॉकड्रिल अर्थात विमानतळावरील आपत्तीजनक परिस्थितीमधील यंत्रणांच्या प्रतिसादाची कवायत करण्याचे आदेश दिले होते.
या पार्श्वभूमीवर कोल्हापूर विमानतळावर रविवारी हे मॉकड्रिल झाले. उजळाईवाडी-नेर्ली तामगाव रस्त्याच्या बाजूला धावपट्टीजवळ विमान दुर्घटना झाल्याची माहिती यंत्रणांना दिली गेली अन् अवघ्या काही मिनिटांतच सर्व यंत्रणा वेळेवर दाखल होत त्यांनी मदत आणि बचावकार्य सुरू केले. यात विमानतळ फायर विभागाचे जवान, क्यूआरटी पथक, दंगल नियंत्रण पथक, बॉम्बशोध पथक, पोलिस दल, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, एटीएस पथक तसेच मनपा अग्निशमन दल, रुग्णवाहिका यांचा समावेश होता. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, विमानतळ संचालक अनिल शिंदे हेदेखील उपस्थित होते.