कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या विकासासाठी हद्दवाढ होणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामीण भागातही सकारात्मक वातावरण असणे महत्त्वाचे आहे. यासाठी आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक यांनी सहकार्य करावे, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. प्रायव्हेट हायस्कूल मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेल्या विविध विकासकामांच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, सीपीआरमध्ये उपचारासाठी विविध अत्याधुनिक सुविधा उपलब्ध केल्या. तसेच शेंडा पार्क येथेही सुसज्ज असे १२०० बेडचे हॉस्पिटल होत आहे. पुढील दोन वर्षांत कोल्हापूरसह कोकण व कर्नाटकमधील रुग्णांना उपचारासाठी मुंबईला जाण्याची गरज पडणार नाही.
कोल्हापूर बदलतंय : पालकमंत्री
स्थानिक वृत्तवाहिनीमध्ये ‘कोल्हापूर बदलतंय’ अशी एक जाहिरात पहायला मिळते. महायुतीचे सरकार सत्तेत आल्यापासून खरंच कोल्हापूर बदलतंय. राज्यात महायुती सरकार सत्तेत येण्यामध्ये कोल्हापूरचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून कोल्हापूरच्या विकासाला गती दिली जात आहे.
‘हेरिटेज सिटी घोषित करा’
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी जयपूर पिंकसिटीच्या धर्तीवर कोल्हापूरला हेरिटेज सिटी म्हणून घोषित करा. शहरात ७४ हेरिटेज इमारती आहेत. त्यांचे जतन संवर्धन करून येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली.
मनपा इमारत, काँक्रीट रस्त्यांसाठी निधी द्या
महायुती सरकारने शहर विकासासाठी पाच महिन्यांत ५८७ कोटी निधी दिला आहे. आता शेंडापार्क येथे मनपा इमारत उभारणी व शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठी महापालिकेला निधी द्यावा, अशी मागणी महापौर रूपाराणी निकम यांनी केली.
कोल्हापूरला काही कमी पडू देणार नाही
फडणवीस म्हणाले, माझ्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांचे कोल्हापूर प्रेम आहे. तांबड्या-पांढर्यावरही प्रेम आहे. कोल्हापूरकरांनी महायुतीला भरभरून आशिर्वाद दिला आहे. तुमच्यासाठी काही केले नाही तर आमच्यासारखे कोणी करंटे नाही. आजपर्यंत कोल्हापूरला काही कमी पडू दिले नाही आणि यापुढेही काही कमी पडू देणार नाही.
पालकमंत्र्यांनी वाचला विकासकामांचा पाढा
दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरच्या विकासकामांचा पाढा वाचला होता, याप्रसंगाची आठवण करून देत महायुती सरकारने कोल्हापूरच्या विकासासाठी भरघोस निधी दिला आहे. पण ही विकासकामे विसरली जात असल्याने त्यांची वारंवार आठवण करून द्यावी लागते असे म्हणत, पालकमंत्री आबिटकर यांनी कोल्हापूरच्या विकासकामांचा पाढा वाचला.
महापूर नियंत्रण प्रकल्पाचे बीज ७२ तासाच्या सरकारमध्ये...
कोल्हापूर व सांगलीतील महापूर नियंत्रणासाठी ४८४ कोटीतून प्रकल्प राबविण्यात येत आहे. मात्र या प्रकल्पाचे बीज ७२ तासांच्या सरकारमध्ये रोवल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मी आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकार स्थापनेची शपथ घेतली. विश्वासदर्शक ठरावापूर्वीच जागतिक बँकेचे पथक आले होते. चर्चेत या प्रकल्पाला तत्वःता मान्यता दिली. नंतर हा प्रकल्प रखडला. पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर गती मिळाली. दोन वर्षे मित्रा संस्थेच्या माध्यमातून उपाध्यक्ष, आ. राजेश क्षीरसागर यांनी पाठपुरावा केला. प्रकल्पाला मान्यता मिळाल्याने आता महापुराचा प्रश्नही सुटेल.