कोल्हापूर : महाविकास आघाडी असली तरी सर्वांना पक्षवाढीची मुभा आहे. कोल्हापूर शहरातील 81 प्रभागांत शिवसेना आणि मशाल हे चिन्ह पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींना कळवू. आघाडी झाली तर किमान 18 जागा ताकदीने लढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार सुनील प्रभू यांनी केले. संख्येने कमी असलो तरी जिद्दीने पुढे. निष्ठावंत शिवसैनिकांवर अन्याय होऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर उत्तर, दक्षिण व करवीर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकार्यांची आ. प्रभू यांनी आढावा बैठक घेतली. सर्किट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत ते बोलत होते. संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार, महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे, जान्हवी सावंत, श्रध्दा जाधव प्रमुख उपस्थित होते.
शिवसेनेत आले किती आणि गेले किती? तरीही स्वाभिमानी कोल्हापुरातले शिवसेनेचे संघटन मजबूत आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांचे जाळे आहे. शिवसेनाप्रमुखांचा वारसा आणि उद्धव ठाकरे यांचे विचार यांच्याशी प्रामाणिक असलेले शिवसैनिक कोल्हापुरात आहेत. त्यांच्या बळावर कोल्हापुरातील महापालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही, असेही आ. प्रभू म्हणाले.
पवार यांनी विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तरची जागा शिवसेनेला मिळाली असती तर जिल्ह्यात शिवसेनेचा आमदार झाला असता, अशी खंत व्यक्त केली. कोल्हापूर उत्तरची जखम अजून ओली असल्याचे सांगितले. कोल्हापुरातील काही भ—ष्ट लोकप्रतिनिधींना आणि त्याला साथ देणार्या प्रशासना विरुद्ध विधानभवनात आवाज उठवण्यासाठी मदत करावी, असे आवाहन केले.
यावेळी संपर्कप्रमुख दुधवडकर, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, महेश उत्तुरे यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीला शहरप्रमुख सुनिल मोदी, रविकिरण इंगवले, महेश उत्तुरे, चंगेजखान पठाण, अवधूत साळोखे, हर्षल पाटील, हर्षल सुर्वे, मंजित माने, राजू यादव, अनिता ठोंबरे, दीपाली शिंदे, विशाल देवकुळे आदींसह इतर उपस्थित होते.
उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे दोन्ही भाऊ सक्षम आहेत. महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांनी एकत्र यावे, ही जनतेची इच्छा आहे. एकीविषयी तेच ठरवतील. शिवसैनिकांच्या जिद्दीवर शिवसेना टिकून आहे. उद्धव ठाकरे यांचा करिष्मा असल्याने येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेला चांगले यश मिळेल, असे आ. प्रभू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.