Satej Patil | सत्ता स्थापनेसाठी मुश्रीफांनी मदत मागितल्यास विचार करू : आ. सतेज पाटील Pudhari Photo
कोल्हापूर

Satej Patil | सत्ता स्थापनेसाठी मुश्रीफांनी मदत मागितल्यास विचार करू : आ. सतेज पाटील

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी महायुतीअंतर्गत लढला आहे. साहजिकच ते आमच्यासोबत येणार नाहीत. परंतु, राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेत स्वतंत्रपणे सत्ता स्थापन करण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी मदत मागितल्यास त्याचा विचार करू, असे काँग्रेसचे नेते, आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी (दि. 9) पत्रकार परिषदेत सांगितले.

जिल्ह्यात महाविकास आघाडीअंतर्गत काँग्रेसने 15, स्वाभिमानी 1, शिवसेना ठाकरे गट 1, शिवशाहू आघाडी 1 अशा एकूण 18 जागा जिंकल्या आहेत. महायुतीला त्यांची सत्ता असल्याने यश मिळाले आहे. परंतु, भाजपच्या विरोधात काँग्रेस सक्षम विरोधी पक्ष म्हणून राज्यात पुढे येत आहे. गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांचा मुलगा सचिन पाटील यांचा पराभव झाला. त्यांना शिवसेनेची समीकरणे जुळतात, असे वाटल्याने तो निर्णय घेतला; मात्र सचिन पाटील व राजेंद्र सूर्यवंशी काँग्रेसमधून निवडणूक लढले असते, तर विजयी झाले असते. काँग्रेससोबत 50 वर्षे राहून अचानक पक्ष बदल केल्याचा त्यांना फटका बसला.

उद्याचा डाव आजच सांगण्यात मजा नाही...

जिल्हा परिषद निकालाने तुमची विधान परिषदेची गणिते बिघडणार का, या प्रश्नावर आ. पाटील म्हणाले, माझी विधानसभेची मुदत डिसेंबर 2027 पर्यंत आहे. अद्याप दोन वर्षे आहेत. तोपर्यंत राज्यात महायुतीचे सरकार राहील की नाही, हे सुद्धा कोणाला माहीत नाही. राजकारणात काहीही होऊ शकते. मी विधान परिषद लढवेन की विधानसभा? याबाबतचा उद्याचा डाव (खेळी) आजच सांगण्यात मजा नाही.

महाडिकांनी गोकुळकडे व्यवसाय म्हणून बघितले...

सहकारातील निवडणुका वेगळ्या असतात, असे सांगून आ. पाटील म्हणाले, गोकुळ, जिल्हा बँक या संस्था आम्ही पक्षविरहीत चालविल्या. त्यात राजकारण आणले नाही. फक्त सभासदांचे हित जोपासले; परंतु महाडिकांनी गोकुळकडे व्यवसाय म्हणून बघितले. त्यामुळे हातातून गोकुळ गेल्यावर महाडिकांना दु:ख झाले, असा टोलाही त्यांनी हाणला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT