कोल्हापूर : ‘गोकुळ’ निवडणूक मतमोजणीदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले आणि समविचारी आघाडीचे उमेदवार अभिजित तायशेटे यांच्यात शाब्दिक वाद झाला. वादावादीची माहिती मिळताच आ. सतेज पाटील रमणमळा येथील मतमोजणी सुरू असलेल्या हॉलमध्ये दाखल झाले. त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी ‘गोकुळ’चा निकाल जाहीर करेपर्यंत सुमारे चार तास येथे तळ ठोकला. निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांनी उमेदवार, कार्यकर्त्यांसह हॉलबाहेर जल्लोष केला.
मतमोजणीदरम्यान मतदान एकत्रीकरण करण्याच्या ठिकाणी दोन्ही आघाड्यांचे प्रतिनिधी बसून होते. मतदानाची आकडेवारी असणारी प्रत्येक मतपत्रिका बारकाईने तपासली जात होती. यामुळे आकडेवारी एकत्र करण्यात विलंब होत असल्याचे सांगितले.
या ठिकाणी गर्दी झाल्यानंतर निवडणूक अधिकारी चौगुले यांनी येथील कार्यकर्त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. तसेच, तेथे आलेले अभिजित तायशेटे यांनाही पुढे जाण्यास मज्जाव केला. यावरून संतप्त झालेले तायशेटे यांनी ‘आमच्याच लोकांना का रोखता?’ असा सवाल केला. यावरून तायशेटे व चौगुले यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. वादाची माहिती मिळताच आ. सतेज पाटील तेथे दाखल झाले. त्यांनी मतमोजणी प्रक्रियेची माहिती घेतली. तसेच, मतमोजणी पूर्ण होऊन निकाल जाहीर होईपर्यंत ते तेथेच बसून राहिले. निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी आ. पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांना खांद्यावर उचलून घेत जल्लोष केला.
मतमोजणी प्रक्रिया रेंगाळली
सकाळी आठ वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. केंद्रनिहाय मतमोजणी घेण्यात आली. मतदान एकत्रीकरणाच्या ठिकाणी दोन्ही आघाड्यांचे प्रतिनिधी बसल्याने ही प्रक्रिया हळुवार झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकार्यांनी दिली. रात्री आठ वाजता बारा तासांनी निकाल जाहीर झाल्याने उपस्थितांमध्ये मतमोजणीची प्रक्रिया रेंगाळली असल्याची चर्चा सुरू होती.