कोल्हापूर : कोणी रुसू नका.. राजकीय परिस्थिती बिकट आहे... आपल्याकडे इच्छुकांची संख्या अधिक आहे... त्यामुळे शक्यतो इच्छुकांनी आपापसांत मिटवावे... माझी परिस्थिती समजून घ्या... वेळ कमी आहे... काही शंका असेल तर मला थेट भेटा, विचारा; पण बाहेर चर्चा करू नका, असे भावनिक आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.
महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने इच्छुकांच्या मुलाखतीचा मंगळवारी व बुधवारी दोन दिवसांचा कार्यक्रम जाहीर केला होता. पहिल्या दिवशी 10 व बुधवारी दुसर्या दिवशी 10 प्रभागांतील इच्छुकांच्या मुलाखती ठेवल्या होत्या. पहिल्या दिवशी 135 आणि बुधवारी 194 इच्छुकांनी अशा 329 इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. दुसर्या दिवशीही काँग्रेस कमिटीमध्ये गर्दी झाली होती. मुलाखती झाल्यानंतर आमदार पाटील सर्व इच्छुकांना रुसू नका, समजून घ्या, असे भावनिक आवाहन करत होते. यावर बहुतांशी सर्व इच्छुक आपण जो निर्णय द्याल, तो मान्य असेल, असा शब्द देत मुलाखतीचा हॉल सोडत होते.
10 ते 20 प्रभागांमध्ये इच्छुकांची संख्या अधिक असल्यामुळे सकाळी 9 वाजताच मुलाखतींना सुरुवात करण्यात आली. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत या मुलाखती चालल्या होत्या. बुधवारी झालेल्या मुलाखतींमध्ये यशोदा आवळे, जयश्री चव्हाण, सचिन चव्हाण, रियाज सुभेदार, उदय पोवार, ईश्वर परमार, वृषाली कदम, पद्मजा भुर्के, माणिक मंडलिक, प्रवीण सोनवणे, भूपाल शेटे, शमा मुल्ला, विनायक फाळके, अमर समर्थ, विजय सूर्यवंशी, शिवाजी कवाळे, अश्विनी कदम, संजय मोहिते, सुरेश ढोणुक्षे, पद्मावती पाटील, उत्तम शेटके, शोभा कवाळे, प्रवीण केसरकर, दुर्वास कदम, मधुकर रामाणे, वनिता देठे, प्रतीक्षा पाटील या माजी नगरसेवकांचा समावेश आहे.
माजी आमदार ऋतुराज पाटील, सचिन चव्हाण, आनंद माने, राजू लाटकर, भारती पोवार, सरलाताई पाटील, भरत रसाळे यांच्या उपस्थितीत मुलाखती घेण्यात आल्या.
47 माजी नगरसेवक इच्छुक
काँग्रेसकडून वृषाली कदम व दुर्वास कदम आणि जयश्री चव्हाण व सचिन चव्हाण या पती, पत्नींनी उमेदवारी मागितली आहे. मुलाखती दिलेल्या 329 इच्छुकांमध्ये महापौर, उपमहापौर यांच्यासह तब्बल 47 माजी नगरसेवकांचा समावेश आहे.
आम्हालाही मुख्य प्रवाहात यायचे आहे
काँग्रेसकडून सुरू असलेल्या इच्छुकांच्या मुलाखतीमध्ये काही तृतीयपंथीयांनी देखील मुलाखती दिल्या. यावेळी त्यांनी आम्हालाही समाजाच्या मुख्य प्रवाहात यायचे आहे, असे सांगत त्यांनी उमेदवारीची मागणी केली.