कोल्हापूर

आ. पी. एन. पाटील यांची प्रकृती ‘जैसे थे’

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पी. एन. पाटील यांची प्रकृती 'जैसे थे' आहे. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान, कार्यकर्त्यांची रीघ सुरूच आहे. आमच्या नेत्याला बरे कर यासाठी कार्यकर्त्यांकडून गावोगावी विविध मंदिरांतून प्रार्थना केल्या जात आहेत. सोशल मीडियावरही आमच्या पांडुरंगाला लवकर बरे कर, असे साकडे घालणारे संदेश व्हायरल होत आहेत.

आ. पाटील यांच्यावर अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना कृत्रिम श्वासोच्छ्वास दिला आहे. त्यांना संपूर्णपणे जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले आहे. हॉस्पिटल आवश्यक ते उपचार करत असून त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष असल्याचे पत्रक हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉ. उल्हास दामले यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

रविवारी सकाळपासून हॉस्पिटलमध्ये केवळ मतदारसंघातील नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची आ. पाटील यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी रीघ लागली आहे. तेथे

आ. पाटील यांचे चिरंजीव राहुल आणि राजेश यांना भेटून साहेब लवकर बरे होतील, असा दिलासा देत त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केल्याचे सांगत आहेत. सलग तिसर्‍या दिवशी हॉस्पिटलचा परिसर कार्यकर्त्यांनी फुलून गेला होता.

गोकुळतर्फे प्रार्थना

आमदार पाटील यांची प्रकृती सुधारावी व लवकर बरे व्हावेत यासाठी गोकुळ परिवारामार्फत गोकुळच्या ताराबाई पार्क येथील हनुमान मंदिरामध्ये अभिषेक घालून प्रार्थना करण्यात आली. यावेळी गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, बाळासाहेब खाडे, प्रकाश पाटील, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंखे, संकलन व्यवस्थापक एस. व्ही. तुरंबेकर, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम उपस्थित होते.

दरम्यान, परदेशात गेलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील हे परतीच्या प्रवासाला निघाले असून गुरुवारी (दि.23) रात्री उशिरा ते कोल्हापुरात पोहोचणार आहेत.

SCROLL FOR NEXT