कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आमदार पी. एन. पाटील रविवारी सकाळी निवासस्थानी बाथरूममध्ये तोल जाऊन पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने अॅस्टर आधार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई व कोल्हापूर येथील विशेष वैद्यकीय तज्ज्ञांनी त्यांच्यावर त्वरित शस्त्रक्रिया केली. आमदार पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे अॅस्टर आधार प्रशासनाने दै. 'पुढारी'शी बोलताना सांगितले. गेल्या आठवडाभरापासून त्यांना कमी रक्तदाबाचा त्रास सुरू होता.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारात आमदार पी. एन. पाटील सक्रिय होते. संपूर्ण मतदार संघ त्यांनी पिंजून काढला होता. मतदानापूर्वी काही दिवस त्यांना थकवा जाणवत होता. यामुळे ते काही दिवस घरी थांबले. कमी रक्तदाबाचा त्रास सुरू झाला होता. काही चाचण्याही करण्यात आल्या. ते घरीच उपचार घेत होते. शनिवारी रात्रीही त्यांना घरी सलाईन लावण्यात आली होती. आज सकाळी बाथरूममध्ये चक्कर येऊन ते कोसळले.
त्यांच्या डोक्याला व हाताला गंभीर मार लागल्याने त्यांना तातडीने अॅस्टर आधार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टर दुपारी विशेष विमानाने कोल्हापुरात आले. कोल्हापूर व मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टरांनी आमदार पाटील यांच्यावर शस्त्रक्रिया केली. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्याच आले.
आमदार पी. एन. पाटील यांना रुग्णालयात दाखल केल्याचे समजताच दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, दै. 'पुढारी'चे चेअरमन डॉ. योगेश जाधव, शाहू महाराज, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार ऋतुराज पाटील, आ. वैभव नाईक, माजी आ. महादेवराव महाडिक, मालोजीराजे, डी. वाय. पाटील ग्रुपचे डॉ. संजय डी. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, 'गोकुळ'चे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, बाळासाहेब खाडे, बाबासाहेब चौगले, भोगावती कारखान्याचे चेअरमन एस. ए. पाटील, संचालक मानसिंग पाटील, दत्ता पाटील (मंदूरकर), श्रीपतराव बोंद्रे बँकेचे संचालक अभिजित पाटील (भुये), बी. एच. पाटील, माजी नगरसेवक राजेश लाटकर, संजय मोहिते, शारंगधर देशमुख, राहुल माने, करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, इंद्रजित सलगर, मानसिंग बोंद्रे, उद्योगपती शिवाजीराव मोहिते, 'गोकुळ'चे माजी संचालक सत्यजित पाटील, धैर्यशील देसाई, माजी जि. प. सदस्य राहुल देसार्ई, निवृत्ती संघाचे चेअरमन आप्पासाहेब माने, बाजार समितीचे संचालक पै. संभाजी पाटील यांच्यासह सामाजिक, राजकीय क्षेत्रांतील मान्यवरांनी रुग्णालयात जाऊन आ. पाटील यांचे चिरंजीव माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, श्रीपतराव बोंद्रे बँकेचे चेअरमन राजेश पाटील यांची भेट घेऊन पी. एन. पाटील यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली.
कार्यकर्त्यांची रुग्णालयाबाहेर गर्दी
आमदार पी. एन. पाटील यांना रुग्णालयात दाखल केल्याची बातमी वार्यासारखी जिल्ह्यात पसरली. त्यानंतर जिल्ह्यातील कानाकोपर्यातून कार्यकर्ते रुग्णालयाच्या आवारात दाखल झाले. यामुळे रुग्णालयाच्या आवारात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. आमदार पाटील यांची तब्येत कशी आहे, यांची विचारणा कार्यकर्ते करत होते.