कोल्हापूर/जयसिंगपूर : कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात गांजा तस्करी करणाऱ्या मिरजेतील सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने चिपरी फाट्याजवळ सापळा रचून जेरबंद केले. वैभव राजाराम आवळे ( वय 26, रा. हडको कॉलनी, शंभर फुटी रस्ता, मिरज) असे त्याचे नाव आहे. संशयिताकडून 1 लाख 82 हजार रुपये किमतीचा 5 किलो गांजा हस्तगत करण्यात आला.
संशयित वैभव आवळे सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दरोडा, आर्म ॲक्टसह विविध 8 गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड असल्याचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले. संशयिताविरुध्द जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित आवळे हा दुचाकीवरून गांजा तस्करीसाठी सांगली जिल्ह्यातून कोल्हापूरकडे येत असल्याची माहिती लागली. सहाय्यक निरीक्षक सागर वाघ, संतोष गळवे यांच्यासह पथकाने चिपरी फाट्याजवळ सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. झडतीत 1 लाख 82 हजार 500 रूपये किंमतीचा गांजा आढळून आला.