इचलकरंजी : सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका मुलीवर लैंगिक अत्याचार, तर दुसर्या मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि. २७) उघडकीस आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी समीर अल्लाबक्ष मणेर (वय २१, रा. पवार माळ, इचलकरंजी) या संशयितावर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले.
संशयित समीर मणेर याने काही अल्पवयीन मुलींना फूस लावून जाळ्यात ओढून अत्याचार केल्याची माहिती काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना समजली. त्यांनी संशयिताचा शोध सुरू केला. मात्र, समीर मणेर पसार झाला. यादरम्यान त्याचा भाऊ आढळला. त्याच्या मोबाईलमध्येही आक्षेपार्ह मजकूर आढळल्याने जमावाने त्याला चोप दिला. आणखी एक नातेवाईक तिथे आला. तोही जमावाच्या हाती सापडला. पोलिसांनी जमावाच्या तावडीतून त्यांची सुटका केली. घटनेची माहिती समजताच पोलिस ठाण्यासमोर मोठी गर्दी झाली.
सायंकाळी दोन अल्पवयीन मुलींच्या तक्रारी दाखल झाल्या. पहिल्या तक्रारीनुसार, सोशल मीडियावरील संपर्कातून मुलीशी मैत्री करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर खोलीत तिच्यावर अत्याचार केल्याचा मणेरवर गुन्हा दाखल झाला. दुसर्या तक्रारीत विवाहाचे आमिष दाखवून मुलीचा विनयभंग केल्याचे तसेच तिचा पाठलाग केल्याचेही नमूद केले आहे. मणेर बंधूंवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल, आंतरराष्ट्रीय महिला कक्ष, ओजस्विनी वाहिनी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आदी संघटनांनी केली आहे.