हुपरी : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सनी साताप्पा कांबळे (वय 28, रा. कारदगा, ता. निपाणी, जि. बेळगाव) याला हुपरी पोलिसांनी अटक केली. त्याला इचलकरंजी न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
सनी कांबळे हा डंपरचालक म्हणून काम करीत होता. यादरम्यान मुलीशी त्याची ओळख झाली होती. पीडित मुलीला विवाहित असलेल्या सनीने लग्नाचे आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले होते. याबाबत हुपरी पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी मुलगी बेपत्ता असल्याबातची फिर्याद दाखल होती. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे करीत होते. कर्नाटकातील मंड्या व पंढरपूर (जि. सोलापूर) येथील पांढरवाडी येथे त्या मुलीला ठेवल्याची माहिती समजताच पोलिस पथकाने शोध घेऊन पीडितेसह सनी कांबळेला पांढरवाडी येथून ताब्यात घेतले. त्याच्यावर हुपरी पोलिसांत पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.