कोडोली : रूम भाड्याने हवीय, असं म्हणत गल्लीत फिरणार्या एका अनोळखी महिलेने घरामागे एकट्याच खेळणार्या पाच वर्षीय बालिकेला पळवून नेण्याचा धाडसी प्रयत्न केला. मात्र, चिमुकलीचा आक्रोश ऐकून धावून आलेल्या एका शेजारी महिला कमल ढेरे यांनी हा प्रयत्न हाणून पाडल्याची थरारक घटना रविवारी सायंकाळी कोडोलीतील वैभवनगर परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास, वैभवनगर वसाहतीत एक अनोळखी महिला ‘रूम भाड्याने पाहिजे’ असे कारण सांगून गल्लीबोळातून फिरत होती. गाव तलावाशेजारील गल्लीत पोहोचल्यावर, सद्दाम अत्तार यांची पाच वर्षांची मुलगी, उमीरा, घराच्या मागे एकटीच खेळत असल्याचे तिच्या निदर्शनास आले. हीच संधी साधून त्या महिलेने क्षणाचाही विलंब न लावता चिमुकल्या उमीराला उचलून पळ काढण्याचा प्रयत्न केला.
घाबरलेल्या उमिराने आरडाओरड केला. उमीराचा आक्रोश ऐकून शेजारी राहणार्या कमल ढेरे यांनी प्रसंगावधान दाखवले. त्यांनी तत्काळ घराबाहेर धाव घेतली असता, एक महिला उमीराला घेऊन पळत असल्याचे त्यांना दिसले. क्षणाचाही विचार न करता, कमल ढेरे यांनी त्या महिलेचा पाठलाग केला आणि तिला गाठून ढेरे यांनी धाडसाने तिच्या तावडीतून उमीराची सुटका केली. ढेरे यांच्या धाडसाचे परिसरात कौतुक होत आहे.
लोक जमा होत असल्याचे पाहून अपहरणकर्त्या महिलेने तेथून पळ काढला आणि गावतलावाशेजारी उभ्या असलेल्या एका चारचाकी गाडीतून पलायन केले. पोलिसांना माहिती देण्यात आली असून तपास सुरू असल्याचे समजते.
या घटनेने प्रचंड घाबरलेल्या उमीराला तिच्या आईने, आयेशा यांनी, जवळ घेऊन धीर दिला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी अत्तार यांच्या घराबाहेर मोठी गर्दी केली. एका धाडसी महिलेच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी, या घटनेने वैभवनगर परिसरातील पालकांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा अनोळखी व्यक्तींपासून सावध राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.