कोल्हापूर

Kolhapur accident | पुलाची शिरोलीत अल्पवयीन मुलाचा स्टंट अंगलट; भरधाव कारच्या धडकेत दोन महिला गंभीर जखमी

या अपघातात दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले आहे

पुढारी वृत्तसेवा

नागाव : पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथील माळवाडी परिसरात एका भरधाव कारने पादचारी महिलांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या या भीषण अपघातात दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. विशेष म्हणजे, कार चालवणारा अल्पवयीन असल्याची चर्चा परिसरात सुरू असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळच्या सुमारास पुलाची शिरोलीतील माळवाडी परिसरातील कोरगावकर कॉलनी येथे सास्का पतसंस्थेसमोर हा अपघात घडला. शिरोली औद्योगिक वसाहतीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने रस्त्यावरून जाणाऱ्या दोन महिलांना जोरदार धडक दिली. त्यानंतर अनियंत्रित झालेली कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुसऱ्या एका वाहनावर आदळली. या दुर्घटनेत अश्विनी गोपाळ परब (वय ५०) आणि उल्का काकासो माळकर (वय ४३, दोघीही रा. शिरोली) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले आहे.

अल्पवयीन चालकांमुळे परिसरात संताप

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कारमध्ये दोन अल्पवयीन मुले होती आणि कार अतिशय वेगाने चालवली जात होती. अल्पवयीन मुलांच्या हाती स्टिअरिंग आणि पोलिसांचा कमी असलेला वचक यामुळेच अशा प्रकारच्या जीवघेण्या घटना घडत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. अल्पवयीन चालकांचा बेजबाबदारपणा नागरिकांच्या जिवावर उठला असल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT