कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर शिवसेनेतील अनेक नेते नाराज झाले आहेत. त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला दिला आहे. तर दुसरीकडे, कोल्हापूर उत्तरचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) मंत्रिपदाबाबत सुचक विधान केले आहे. राज्य मंत्रिमंडळात 2 वर्षानंतर फेरबदल होणार असून त्याबाबतचे बॉण्ड लिहून घेतले आहेत, असे मोठे विधान त्यांनी केले आहेत. ते आज (दि.२१) पत्रकारांशी बोलत होते.
आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले की, केंद्रीय मंत्रिमंडळाने 'एक देश एक निवडणुकीला मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे या माध्यमातून 2029 मध्ये लवकर निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावेळच्या सरकारचा कार्यकाळ चार ते सव्वा चार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2 वर्षानंतर फेरबदल होऊन मला नक्की न्याय मिळेल, आम्ही याबाबत मागणी सुद्धा करणार आहोत, असे क्षीरसागर म्हणाले.
2014 च्या निवडणुकीत माझ्यावर अन्याय झाला आहे, अशी खंत व्यक्त करत आता पुन्हा असे होणार नाही, यावेळी नक्की मला संधी मिळेल. पक्षाची काही धोरण असतात. त्यामुळे आपल्याला ती मान्य करावी लागतात, असे ते म्हणाले.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात एकेकाळी सहा आमदार असताना देखील मंत्रिपद मिळाले नव्हते. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादामुळेच शिवसेनेला (Shiv Sena) पहिल्यांदा मंत्रिपद मिळाले आहे. शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला, अशी प्रतिक्रिया कॅबिनेट मंत्री प्रकाश अबिटकर यांनी दिली.