कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. दहापैकी पाच आमदार शिवसेनेचे, तर एक खासदारही आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूरवर विशेष लक्ष असल्याने विकासकामांसाठी भरघोस निधी दिला आहे. त्यामुळे पक्षीय पातळीवर घरोघरी जाऊन जास्तीत जास्त सभासद करून पक्षप्रमुख, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे हात बळकट करा. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जुन्यांना न डावलता नव्यांनाही संधी देऊ, असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.
कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्यांची मंत्री सामंत यांनी बैठक घेतली. पदाधिकारी निवडीबाबत चर्चा करून मार्गदर्शन केले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी व संजय मोरे, माजी खा. राहुल शेवाळे, माजी खा. संजय मंडलिक, आ. चंद्रदीप नरके, माजी आ. सुजित मिणचेकर प्रमुख उपस्थित होते.
मंत्री सामंत म्हणाले, जिल्ह्यात शिवसेना (शिंदे गट) हाच मोठा पक्ष आहे. पदाधिकार्यांनी जास्त सभासद नोंदणी करावी, जेणेकरून लोकसभा निवडणुकीत पराभव झालेली जागा पुन्हा जिंकू. सभासद हा पक्षाचा पाया असल्याने मर्यादीत राहून काम करू नका. शिवसेना हा पक्ष ताठ मानेने पक्षांतर्गत निवडणुकीला सामोरा जात आहे. जुन्यांना न डावलता नव्याने आलेल्यांना संधी देऊ. यंदा जिल्हा संघटक हे पद नव्याने निर्माण केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रत्येक पक्षाची ताकद कळेल. त्यात आपण एक नंबरवर असायला पाहिजे. मंडलिक यांनी सभासद नोंदणीकडे पदाधिकार्यांनी दुर्लक्ष करू नये, अशी सूचना केली. आ. नरके यांनी सभासद याद्या तपासूनच द्याव्यात, असे सांगितले. मिणचेकर यांनी जिल्ह्यात एक नंबरला येऊ, असे सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या अडीच वर्षांच्या कालावधीत लाडकी बहीण योजनेसह विविध कल्याणकारी योजना राबविल्या. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत महायुतीला इतिहासात पहिल्यांदाच 224 जागा मिळाल्या. कोल्हापूर जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. लवकरच महापालिका, जिल्हा परिषदेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यात शिवसेनेला उत्तुंग यश मिळेल, असे आ. राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.