कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणप्रश्नी आयोजित बैठकीत बोलताना पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे. यावेळी उपस्थित महापौर रूपाराणी निकम, इचलकरंजीचे महापौर उदय धातुंडे, आमदार सर्वश्री अमल महाडिक, राहुल आवाडे, अशोक माने, चंद्रदीप नरके, माजी खासदार राजू शेट्टी, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड आदी.  (छाया : नाज ट्रेनर)
कोल्हापूर

Pankaja Munde | ‘सीईटीपी’ प्रकल्पांना गती द्या : मंत्री पंकजा मुंडे

पंचगंगा प्रदूषण नियंत्रण बैठकीत शेतकरी संघटना आक्रमक

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया (सीईटीपी) प्रकल्पांना गती द्या, असे आदेश पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पंचगंगा प्रदूषण नियंत्रणाबाबत त्यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत शेतकरी संघटना आक्रमक झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

कोल्हापूर, इचलकरंजी येथील प्रदूषित क्षेत्रातील सर्व सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता, प्रत्यक्ष वापर तसेच या प्रकल्पांचा वापर करून योग्य अशा पाण्याचा पुनर्वापर करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. मंत्री मुंडे म्हणाल्या, मंजूर सामूहिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची आणि यांत्रिकीकरणाची कामे तसेच त्यांना जोडणाऱ्या पाईपलाईनची कामे एकाचवेळी सुरू ठेवा. पर्यावरण रक्षणाची जबाबदारी केवळ पर्यावरण विभागाची नाही तर ती सामूहिक असून भविष्यातील धोके नागरिकांनी ओळखून आतापासूनच जागरूक व्हावे. कोल्हापूरसह इचलकरंजी येथील सर्वच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या क्षमतेची पाहणी करून तेथील अहवाल सादर करा. छोट्या गावांचे पर्यावरणपूरक प्लॅन तयार करा, असेही त्यांनी सांगितले.

लोकसंख्येच्या निकषावर त्या त्या गावांत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे प्लॅन तयार करावेत, अशी सूचना आ. चंद्रदीप नरके यांनी केली. पंचगंगा नदीतील जलपर्णी काढण्यासाठी निधीची तरतूद व्हावी, असे आ. राहुल आवाडे यांनी सांगितले. उदय गायकवाड यांनी सांडपाणी पुनर्वापराबाबत कार्यवाही करावी, असे सांगितले.

जिल्हा परिषदेकडून ४१ कोटींची कामे सुरू असून सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी जिल्हा परिषदेला अतिरिक्त निधी मिळावा, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी केली. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड व इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी त्यांच्या नियंत्रणाबाबत सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. दरम्यान, बैठकीत माजी खासदार राजू शेट्टी यांनी पंचगंगा प्रदूषणप्रश्नी सुरू असलेल्या कामांबाबत आक्षेप घेतला.

बंडोपंत पाटील यांनी इचलकरंजीच्या काळ्या ओढ्याच्या पाण्याने शिरोळ तालुक्यात कॅन्सरचे रुग्ण वाढत असल्याचे सांगितले. त्यावर आमदार आवाडे, इचलकरंजी महापौर उदय धातुंडे यांनी इचलकरंजीलाच दरवेळी दोषी का ठरवता, कोल्हापुरातून येणाऱ्या सांडपाण्यावर का बोलत नाही, असा पवित्रा घेतला. यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. यावेळी आमदार अमल महाडिक, अशोक माने, महापौर रूपाराणी निकम, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड आदी उपस्थित होते.

१६८ बैठका, तरीही काही नाही

प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी पंचगंगा प्रदूषण नियंत्रणप्रश्नी आतापर्यंत १६८ बैठका झाल्या तरीही काहीही होत नसल्याचे सांगितले. गुरुवारीही सकाळी सांडपाणी थेट पंचगंगेत मिसळत होते, त्याचा पंचनामाही केल्याचे सांगत याबाबतचे निवेदन आणि पंचनामा मंत्री मुंडे यांना दिला.

मासे एमआयडीसीत आणून टाकू...

इचलकरंजीतील सीईटीपी प्रकल्पाला नोव्हेंबर २०२७ पर्यंतची डेडलाईन देण्यात आली. त्यावर माजी खा. राजू शेट्टी यांनी जर मुदतीत काम झाले नाही तर मासे एमआयडीसीत आणून टाकू, असा इशारा दिला. त्यावर मुंडे म्हणाल्या, मासे टाकले तर मृत होतील. त्यावर मृत झालेलेच मासे टाकणार, जिवंत मासे तुम्हाला देऊ, असे सांगितले. त्यावरून तणावपूर्ण झालेल्या वातावरणात हस्याचे फवारे उडाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT