बानगे : येथे झालेल्या वारकरी पूजन सोहळ्यातून वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची नम्रता व विनयशीलता अधोरेखित झाली आहे. त्या नम्रतेच्या भावनेतूनच त्यांनी वारकर्यांचे पाय पुजले आहेत, असे प्रतिपादन आळंदी देव संस्थानचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख हभप डॉ. भावार्थ देखणे महाराज यांनी काढले. विणेकरी व तुळशीवाल्या माऊलींचा पूजन सोहळा म्हणजे भक्ती व शक्तीचे दर्शन आहे, असेही ते म्हणाले.
बानगे (ता. कागल) येथे झालेल्या पायी वारीतील विणेकरी व तुळशीवाल्या माऊलींच्या पाद्यपूजन सोहळ्यात हभप डॉ. देखणे बोलत होते. हभप सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री मुश्रीफ यांनी याचे आयोजन केले होते. यावेळी ना. मुश्रीफ व त्यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ यांनी व अन्य मान्यवरांनी विणेकरी वारकर्यांच्या पायाचे पूजन व वंदन केले. तसेच तुळशीवाल्या माऊलींचा आहेर देऊन सत्कारही झाला.
ना. मुश्रीफ म्हणाले, कर्तव्याच्या भावनेतूनच वारी व वारकर्यांबद्दलचे सेवा कार्य मी अखंडपणे करीत आलो आहे. वारकरी चळवळीशी संबंधित आम्ही राबवीत असलेले विविध उपक्रम हे काही मी केलेले उपकार नव्हेत, ते माझे कर्तव्यच आहे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांचे आपणा सर्वांवर अनंत उपकार आहेत. वारकर्यांच्या पायाच्या पूजनाने मी कृतार्थ झालो आहे. हा दिवस माझ्यासाठी परमभाग्याचा आहे.
युवा कीर्तनकार हभप सचिन पवार म्हणाले, वारकर्यांच्या पायाशी राजसत्ता बसली पाहिजे. बानगेतील वारकरी पूजन कार्यक्रमाने हेच घडले आहे. या वारकरी पूजन सोहळ्याच्या माध्यमातून कागलमध्ये परमार्थिक क्रांतीची नांदी सुरू झाली आहे.
मंत्री मुश्रीफ हे संप्रदायिक चळवळीमध्ये रमणारे आहेत. त्या भावनेतूनच त्यांनी साडेसातशेहून अधिक मंदिरांची उभारणी आणि जीर्णोद्धार केला आहे. या सत्कर्माच्या पुण्याईवरच त्यांनी आजपर्यंत यशस्वी वाटचाल केली आहे. पालखी सोहळा प्रमुख म्हणून आज या कार्यक्रमाने आषाढ वारीची पूर्णाहुती पूर्ण झाली अशी माझी भावना आहे, असे डॉ. देखणे म्हणाले.