कोल्हापूर : जि. प. व पं. स. निवडणुकीत विजयी राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या सत्कारप्रसंगी मंत्री हसन मुश्रीफ, गोकुळचे संचालक अरुण डोंगळे, मानसिंग गायकवाड, नंदाताई बाभूळकर, के. पी. पाटील, राजेश पाटील, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, प्रताप माने, गोकुळचे चेअरमन नाविद मुश्रीफ, आदिल फरास आदी उपस्थित होते. (छाया : मिलन मकानदार)
कोल्हापूर

Minister Hasan Mushrif | काम करत राहा, पुढील सत्ता स्वबळावर

मंत्री मुश्रीफ यांचा विश्वास; मनपाप्रमाणेच जि.प.त सत्तेचा फॉर्म्युला

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्हा परिषदेत पक्षाच्या चिन्हावर 35 जागा लढलो. त्यातील 20 जागा जिंकल्या. यापुढे असेच काम करत राहिला, तर पुढील जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीची स्वबळावर सत्ता आणू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी व्यक्त केला. महापालिकेप्रमाणेच जिल्हा परिषदेत सत्तेचा फॉर्म्युला राहणार आहे, असे सांगत जि.प.चा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचाच होणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपालिकांचे नगराध्यक्ष व कोल्हापूर महापालिकेतील नगरसेवकांचा शुक्रवारी मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माजी आमदार राजेश पाटील, के. पी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत धैर्यप्रसाद मंगल कार्यालयात हा कार्यक्रम झाला.

यापूर्वी जिल्हा परिषदेत उपाध्यक्षपदावर समाधान मानावे लागले होते; मात्र यंदा अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसच्याच हाती यावे, यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आणि त्याचे फळ मिळाले, असे सांगत मुश्रीफ म्हणाले, आम्ही सर्वत्र लढलो. काही ठिकाणी चांगले यश मिळाले, काही ठिकाणी आमची ताकद कमी पडली. जिथे कमी पडलो, त्या तालुक्यात पक्षाची ताकद वाढविण्यावर भर देणार आहे. यामुळे भविष्यातील सर्व निवडणुकांसाठी संघटन भक्कम करा, असे आवाहनही त्यांनी केले. सत्ता वाटपाचा जो फॉर्म्युला महापालिकेत राबविला तोच जिल्हा परिषदेतही राबविला जाईल, असे स्पष्ट करत मुश्रीफ म्हणाले, महायुतीसोबतच आपल्याला जिल्हा परिषदेची सत्ता स्थापन करायची आहे. त्यामुळे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकरांची शाहू आघाडी, विनय कोरे यांचा जनसुराज्य शक्ती पक्ष, महायुतीचे प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना यांच्यासोबतच आपल्याला काम करावे लागणार आहे.

माजी आमदार राजेश पाटील यांनी आजरा-चंदगड भागातील फुटीमुळे झालेल्या नुकसानाची कबुली देत मुश्रीफांनी कुपेकर-बाभूळकर वादावर तोडगा काढून दोन्ही गट एकत्र आणले. त्यामुळेच जिल्हा परिषदेत यश मिळाले. यापुढील सर्व निवडणुका आम्ही शंभर टक्के जिंकू, असा विश्वास व्यक्त केला. नंदाताई बाभूळकर यांनी ‘चंदगड पॅटर्न’चा उल्लेख करत राज्यभर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र राहण्याची गरज अधोरेखित केली. स्वागत जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने यांनी केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केले. यावेळी गोकुळचे चेअरमन नाविद मुश्रीफ, संचालक अरुण डोंगळे, मानसिंग गायकवाड, आदिल फरास, राहुल पाटील, धैर्यशील पाटील यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

वाद दाजी की मुश्रीफांचा?

माजी आमदार के. पी. पाटील यांनी भाषणात स्पष्ट केले की, माझ्यात आणि दाजींमध्ये (ए. वाय. पाटील) कोणताही वाद नाही. तो वाद मंत्री हसन मुश्रीफ आणि ए. वाय. पाटील यांच्यात आहे. ‘मी गरीब माणूस, मी कशाला कोणाबरोबर वाद करतो’ असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT