कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या वाढदिवसादिनी सोमवारी अयोध्येतील रामलल्लांचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी 5 - मराठा बटालियनच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमालाही उपस्थिती लावली.
अयोध्येमध्ये 5 - मराठा बटालियन इन्फंट्रीचे युनिट आहे. येथील जवान व अधिकारी गेल्या आठवड्यात मंत्री मुश्रीफ यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी बटालियनचा 225 वा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास अयोध्येला येण्याची विनंती केली होती. त्यानुसार ते या कार्यक्रमास उपस्थित राहिले. यावेळी कर्नल जगदाळे यांनी छत्रपती शिवरायांचा सिंहासनारूढ पुतळा भेट देऊन मंत्री मुश्रीफ यांचा बटालियनच्या वतीने सत्कार केला. ऑनररी लेफ्टनंट संतोष चौगुले यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी, तारखेनुसार दि. 24 मार्चला येणारा माझा वाढदिवस, 5 - मराठा बटालियन इन्फंट्रीचा वर्धापन दिन आणि प्रभू श्री. रामचंद्रांची राजधानी अयोध्यानगरी हा सर्वच एक मोठा योगायोग आहे. प्रभू श्री. रामचंद्रांनी मला बोलावल्याशिवाय असा योगायोग घडून येणे शक्यच नाही, असे सांगितले. त्यांच्यासोबत गोकुळचे संचालक युवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, प्रवीण काळबर, बाळासाहेब तुरंबे आदी उपस्थित होते.