सतेज पाटील, मंत्री चंद्रकांत पाटील Pudhari File Photo
कोल्हापूर

अभ्यासक्रमांबाबत जागृती नसल्याने विद्यापीठातील विद्यार्थी संख्या घटली

मंत्री चंद्रकांत पाटील यांचे सतेज पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचत नसल्यामुळे शिवाजी विद्यापीठाच्या 14 अधिविभागांतील विद्यार्थ्यांची संख्या घटली असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. आमदार सतेज पाटील यांनी याबाबत विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

शिवाजी विद्यापीठात 250 हून अधिक अभ्यासक्रम शिकवले जातात; मात्र रोजगाराच्या संधींशी सांगड न घातल्याने 14 अधिविभागांत 2023-24 या वर्षात प्रवेश क्षमतेइतकेही विद्यार्थी मिळाले नाहीत. मानव्यशास्त्र शाखेतही विद्यार्थी संख्या कमी होत आहे. सध्याचे अभ्यासक्रम कालसुसंगत नसल्याने नव्या शैक्षणिक धोरणात ज्या पद्धतीने बदल अपेक्षित आहेत, त्या गतीने बदल करून हे अभ्यासक्रम रोजगाराभिमुख करण्यासाठी काय उपाययोजना केली आहे, असा प्रश्न आमदार पाटील यांनी उपस्थित केला.

यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठाच्या 2023-24 या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रियेचा आढावा समितीच्या अहवालानुसार 14 अधिविभागांतील अभ्यासक्रमांना प्रवेशक्षमतेपेक्षाही कमी प्रवेश झाल्याची कबुली दिली. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील स्वायत्त महाविद्यालयांमध्ये व संलग्नित महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण केंद्रांची संख्या वाढल्याने त्या महाविद्यालयांमधून विद्यापीठात प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

किती अभ्यासक्रम रोजगाराभिमुख ?

शिवाजी विद्यापीठामध्ये कमी कालावधीचे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू आहेत का, असल्यास त्यातून किती विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला. यावर मंत्री पाटील यांनी नव्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठाने कौशल्यआधारित अभ्यासक्रम तयार केले असून 2024-25 पासून रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू केल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT