कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या तयारीसाठी आयोजित बैठकीत बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील. शेजारी आ. चंद्रदीप नरके, महापौर रूपाराणी निकम, समित कदम, आ. राहुल आवाडे, आ. राजेश क्षीरसागर, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, समरजित घाटगे, प्रकाश आवाडे, जि. प. अध्यक्षा शिल्पा खोत.  arun
कोल्हापूर

Chandrakant Patil | महायुतीची धन्यवाद सभा यशस्वी करा : मंत्री चंद्रकांत पाटील

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्या २० जून रोजी होणाऱ्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीने तयारीला वेग दिला आहे. श्री अंबाबाई मंदिर परिसर विकासासाठी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या १,५०० कोटी रुपयांच्या निधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात येणारी धन्यवाद सभा यशस्वी करण्याचे आवाहन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी महायुतीच्या कार्यकर्त्यांना केले.

भारतीय जनता पक्ष जिल्हा कार्यालयात झालेल्या महायुतीच्या समन्वय बैठकीत ते बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा १९ जूनपासून सुरू होणार आहे. सायंकाळी त्यांचे कोल्हापुरात आगमन होऊन शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम राहणार आहे. २० जून रोजी सकाळी ते श्री अंबाबाई मंदिरात दर्शन घेणार असून, मंदिर परिसर विकासकामांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर पोलिस ग्राऊंडवर आयोजित धन्यवाद सभेला ते संबोधित करतील.

यानंतर अमित शहा इचलकरंजी येथे कल्लाप्पाणा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयाच्या उद्‌घाटन कार्यक्रमास उपस्थित राहणार असून, रात्री ते दिल्लीकडे रवाना होणार आहेत. बैठकीत मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राहुल आवाडे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी अंबाबाई मंदिरात भाविकांना सुलभ दर्शनासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्याची सूचना केली.

खासदार धनंजय महाडिक यांनी महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या समन्वयातून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येईल, असे सांगितले. बैठकीस राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आ. राजेश क्षीरसागर, आ. चंद्रदीप नरके, आ. अशोकराव माने, महापौर रूपाराणी निकम, जि. प. अध्यक्ष शिल्पा खोत, माजी आमदार प्रकाश आवाडे, समित कदम, समरजितसिंह घाटगे यांच्यासह विविध मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्राने दिलेल्या निधीतून अंबाबाई मंदिर परिसराचा विकास होणार

अंबाबाई मंदिर परिसर विकासासाठी केंद्र सरकारने दिलेला निधी हा कोल्हापूरसाठी ऐतिहासिक निर्णय असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. या निधीतून मंदिर परिसराचा विकास, वारसा संवर्धन तसेच भाविकांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. या निर्णयाबद्दल कोल्हापूरकरांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करण्यासाठी ही सभा आयोजित केली आहे, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT