milk adulteration Pudhari File Photo
कोल्हापूर

Kolhapur Milk Adulteration : भेसळीचे कारनामे थांबले, ५३ हजार लिटर दूध घटले

‘अन्‍न-औषध’च्‍या कारवाईचा धसका; पाणी मिसळण्‍याच्‍या प्रकाराला आळा

पुढारी वृत्तसेवा

धीरज बरगे

कोल्‍हापूर : जिल्‍ह्यातील दूध संकलन ५३ हजार लिटरने घटले आहे. अन्‍न- औषध विभागाकडून भेसळयुक्‍त दुधावर सुरू असलेल्‍या कारवाईचा धसका काही भेसळखोरांनी घेतला. जिल्‍ह्यात दूध भेसळीचे प्रमाण अत्‍यल्‍प असून दुधात पाणी मिसळण्‍याचा प्रकार जास्‍त सुरू होता. मात्र आता कारवाईच्‍या भीतीने हा प्रकारदेखील थांबला असल्‍याने दूध उत्‍पादनात काहीशी घट झाली आहे.

कोल्‍हापूर जिल्‍ह्यात सहकारी व खासगी ११ दूध संघांच्‍या माध्‍यमातून दूध संकलन केले जाते. या दूध संघांच्‍या माध्‍यमातून कोल्‍हापूर जिल्‍ह्यासह जिल्‍हा व राज्‍याबाहेरून प्रतिदिन २१.१० लाख लिटर दूध संकलन केले जाते. यामध्‍ये १३.५ लाख लिटर गायीचे तर ८.५ लाख लिटर म्‍हैस दुधाचे संकलन होते. ११ पैकी गोकुळ व वारणा दूध संघाकडून सर्वाधिक दूध संकलन केले जाते.

जिल्‍ह्यातील दूध दर्जेदार

जिल्‍ह्यातील दूध दर्जेदार आहे. दूध भेसळीचे प्रमाण नगण्‍य आहे. परजिल्‍ह्यात केमिकलचा वापर करून होणारा दूध निर्मितीचा प्रकार कोल्‍हापूरमध्‍ये कुठेही नाही. मात्र काही दूध संघांमध्‍ये दुधात पाणी मिसळण्‍याचा प्रकार सुरू होता. कारवाईमुळे या प्रकाराला आळा बसला आहे.

सहकारी दूध संघांची विश्‍वासार्हता वाढली

‘अन्‍न-औषध’च्‍या कारवाईनंतर सहकारी दूध संघांवरील विश्‍वासार्हता वाढली आहे. दूध संस्‍थांच्‍या माध्‍यमातून सहकारी दूध संघ संकलन करतात. एखाद्या दूध उत्‍पादकाने भेसळयुक्‍त दूध पुरवठा केला आणि हा प्रकार तपासणीमध्‍ये उघड झाल्‍यास संबंधित दूध संस्‍थेवर कारवाई होते. त्‍यामुळे दूध संस्‍थापातळीवरच दूध संकलन तपासणी करूनच होते. त्‍यामुळे सहकारी दूध संघांकडील दुधाला सध्‍या बाजारपेठेत मागणी आहे. गोकुळच्‍या दूध विक्रीत सुमारे एक लाख लिटरची वाढ झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT