कोल्हापूर : दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी सांगली-कोल्हापूर दूध उत्पादक व प्रक्रिया व्यवसाय कल्याणकारी संघाने गाय आणि म्हशीच्या दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार, दि. १६ पासून या वाढीव दराची अंमलबजावणी होणार आहे. यानुसार गायीच्या दुधाला प्रतिलिटर ४१ रुपये, तर म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर ६२ रुपये ३० पैसे दर मिळणार आहे.
संघाने जाहीर केलेल्या नवीन दरानुसार, गायीच्या दुधासाठी ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ या गुणवत्तेला प्रतिलिटर ४१ रुपये दर निश्चित केला आहे. तसेच ४.० फॅट व ८.५ एसएनएफ गुणवत्तेच्या दुधासाठी प्रतिलिटर ४२ रुपये ५० पैसे दर देण्यात येणार आहे. म्हशीच्या दुधासाठी ६.५ फॅट व ९.० एसएनएफ या गुणवत्तेला प्रतिलिटर ६२ रुपये ३० पैसे दर निश्चित करण्यात आला आहे. पशुखाद्य, चारा आणि जनावरांच्या देखभालीचा खर्च वाढत असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. खरेदी दरातील वाढीमुळे शेतकऱ्यांना दुधाचा अधिक चांगला मोबदला मिळण्यास मदत होणार आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि दुग्ध व्यवसायाची भरभराट व्हावी, या उद्देशाने दरवाढीचा निर्णय घेतला आहे.
संघटनेचे अध्यक्ष श्रीपाद चितळे, सचिव किरीट मेहता व संजय कुंभोजकर, थोटे दूध डेअरीचे शीतल थोटे, विटा डेअरीचे प्रसाद कुलकर्णी, फलटण सकस दूध संघाचे कदम यांच्यासह अन्य दूध व्यावसायिक या निर्णय प्रक्रियेत सहभागी होते, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.