कोल्हापूर : दूध पॅकिंग खर्चात गोकुळची वर्षाला 500 कोटी रुपये बचत होत आहे. पण या कामाचा ठेका एका विरोधकाच्या जावयाकडे आहे. प्रकल्पातून होणारी बचत गोकुळला जाते, ती रक्कम ‘हुंडा’ म्हणून जावयाला मिळावी, यासाठीच या प्रकल्पाला विरोध केला जातोय का, असा सवाल दूध संस्था प्रतिनिधींनी केला.
दूध संस्था प्रतिनिधींनी शनिवारी प्रशासक मंडळाचे अध्यक्ष संजयकुमार सुद्रीक यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी राजकीय दबावाला बळी न पडता कारभार करा, विरोधकांनी यापूर्वी दिलेल्या ठेक्यातून जावई-ईवाई असे होत असणारे लाड आता बंद करा आणि शेतकर्याला जगवा, असेही यावेळी सुनावले. आत्तापर्यंत मागणी केलेल्या अर्जांची माहिती आठवड्यात द्या, अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
सभासदांनी मागितलेली माहिती कधी मिळणार, त्याची तारीख सांगा, असा आग्रह नारायण पाटील यांनी धरला. यावरून वातावरण तणावपूर्ण बनले. बळीराम खडके यांनी कर्मचार्यांना लई पगार हाय, त्यांना कामाला लावा, तासात माहिती टेबलावर येईल, असे सांगितले. उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे दरवाढ द्या, ते तुम्हाला जमत नसेल तर चेअरमनला बोलवा, त्यांचे मार्गदर्शन घ्या, असे प्रतिनिधींनी सांगितले.
बेलवाडेला अधिकारी घेऊन फिरतातच कसे?
प्रशासक मंडळाचे सदस्य परुळेकर तक्रारदार बेलवाडे यांना पशुखाद्य कारखान्यात घेऊन फिरतातच कसे, अशी विचारणा करत या मंडळातील दोन अधिकार्यांची भूमिका संशयास्पद आहे. संस्था नोंदणीसाठी 40 हजार घेतल्याचा एकावर आरोप आहे. त्यांच्या दबावाला बळी न पडता कारभार करा, असे विकास पाटील म्हणाले. काही कर्मचार्यांना राजकीय दबावातून वेगळी कामे सांगितली जात असल्याचा आरोप सुरेश बोभाटे यांनी केला. आम्हाला गोकुळचे मालक म्हणता आणि प्रवेशद्वारावर अडवणूक कशी करता, अशी विचारणा बळी कळके यांनी केली.
दूध संकलनातील घट नैसर्गिक : सुद्रीक
गोकुळच्या दूध संकलनाची घट ही उष्म्यामुळे आहे. ती नैसर्गिक आहे. मागील महिन्याच्या तुलनेत या महिन्यात घट झाली असली तरी गतवर्षीच्या तुलनेत मे महिन्यात संकलनात वाढ असल्याचे प्रशासक सुद्रीक यांनी सांगितले. गोकुळचा ब—ँड कायम ठेववण्यासाठी दूध उत्पादकांनी इतरत्र दूध न घालता ते गोकुळ संलग्न दूध संस्थांकडेच घालावे, असे आवाहन त्यांनी केले.
गोकुळवर अशासकीय मंडळ नियुक्त करा
गोकुळवर नियुक्त केलेले प्रशासकीय मंडळ बरखास्त करून अशासकीय मंडळ नियुक्त करा, अशी मागणी चुये (ता. करवीर) येथील श्रीराम दूध संस्थेचे संचालक माणिक पाटील-चुयेकर यांनी पत्रकाद्वारे केली आहे.