Children's Day Special | स्थलांतरित बालकांच्या वाट्याला मजुरीचे बालपण! 
कोल्हापूर

Children's Day Special | स्थलांतरित बालकांच्या वाट्याला मजुरीचे बालपण!

उसाच्या फडात अन् वीटभट्ट्यांवर भविष्य अंधारात; विशेष सर्वेक्षण करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

प्रवीण मस्के

कोल्हापूर : दरवर्षी १४ नोव्हेंबरला बालदिन उत्साहात साजरा होत असताना स्थलांतरित ऊसतोड आणि वीटभट्टी कामगारांच्या मुलांचे बालपण मात्र मजुरीच्या ओझ्याखाली दबले जात आहे. शाळेची पाटी हातात घेण्याच्या वयात या बालकांच्या वाट्याला उसाच्या फडातील वास्तव आणि वीटभट्ट्यांवरील प्रतिकूल परिस्थिती येत आहे. बालदिनाच्या पार्श्वभूमीवर या गंभीर वास्तवाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.

बालदिन हा केवळ उत्सवापुरता मर्यादित न राहता प्रत्येक बालकाला शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता व सन्मानाने जगण्याची संधी मिळवून देणारा दिवस ठरला पाहिजे, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे बीड, जालना, धाराशिव, अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून हजारो ऊसतोडणी कामगार कुटुंबे कोल्हापूर जिल्ह्यात दाखल झाली आहेत. त्यांच्यासोबत आलेल्या बालकांच्या शिक्षण, आरोग्य व सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. साखर कारखान्यांच्या कार्यस्थळांवर स्थलांतरित बालकांच्या शिक्षणासाठी काही प्रमाणात व्यवस्था उपलब्ध होते.

मात्र, ऊसतोडणी कामगार ज्या गावांमध्ये व परिसरात कुटुंबासह वास्तव्यास असतात, त्या ठिकाणी बालकांच्या शिक्षणाची पुरेशी सोय नसते. परिणामी, अनेक बालके शिक्षणापासून वंचित राहत आहेत. शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत अधिकार असून स्थलांतरामुळे कोणत्याही बालकाचे शिक्षण थांबू नये, यासाठी सर्व घटकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. ‘अवनि’ संस्थेतर्फे कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत ३४ डे केअर सेंटर चालविली जात आहेत. आतापर्यंत सुमारे ३५ हजार बालकांना शिक्षणाशी जोडण्याचे काम त्यांनी केले आहे.

बालकांच्या शिक्षण आणि बालहक्कांसाठी ‘अवनि’ सातत्याने कार्यरत आहे. स्थलांतरित कामगारांच्या बालकांचे शासनाने तातडीने विशेष सर्वेक्षण करावे. त्यांच्या वास्तव्यास असलेल्या ठिकाणी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
अनुराधा भोसले, ‘अवनि’ सामाजिक संस्था

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT