CPR Hospital | ‘सीपीआर’मध्ये मध्यरात्री अधिष्ठातांकडून ‘झाडाझडती’  Pudhari File Photo
कोल्हापूर

CPR Hospital | ‘सीपीआर’मध्ये मध्यरात्री अधिष्ठातांकडून ‘झाडाझडती’

वेशांतर करून अचानक राऊंड; गैरहजर कर्मचार्‍यांवर थेट कारवाई

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात (सीपीआर) रुग्णसेवेत टंगळामंगळ करणार्‍या कर्मचार्‍यांविरोधात प्रशासनाने आता कठोर पाऊल उचलले आहे. रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि कर्मचार्‍यांच्या दांडगाईमुळे रुग्णसेवेवर होणारा परिणाम रोखण्यासाठी अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी स्वतः शनिवारी मध्यरात्री झाडाझडती घेतली. रात्री दोन ते तीनच्या सुमारास अचानक राऊंड घेऊन ड्युटीवर गैरहजर असणार्‍या कर्मचार्‍यांवर थेट कारवाईचा बडगा उगारल्याने सीपीआरमध्ये खळबळ उडाली आहे.

सीपीआरमध्ये अपघात विभागापासून ते विविध वॉर्डांपर्यंत रुग्णांना उपचारासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याच्या तक्रारी होत्या. उपचारादरम्यान होणारा विलंब आणि काही कर्मचार्‍यांचा निष्काळजीपणा यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता. या गंभीर बाबींची दखल घेत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडेही तक्रारी दाखल झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अधिष्ठाता डॉ. भिसे यांनी शनिवारी मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास अपघात विभागासह विविध वॉर्डांना अचानक भेट दिली.

यावेळी डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, निवासी डॉक्टर आणि इतर कर्मचारी ड्युटीवर हजर आहेत का, याची त्यांनी कसून तपासणी केली. प्रत्यक्ष जागेवर अनुपस्थित असलेल्या कर्मचार्‍यांवर तत्काळ कारवाई केली. गेल्या महिनाभरात त्यांनी अशी चार वेळा अचानक तपासणी केल्याने कामचुकार कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT