म्हाकवे : येथे शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून रणजीत सिद्राम पाटील (वय २८) या तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अवकाळी पावसाच्या तडाख्यात घडलेल्या या घटनेमुळे म्हाकवे परिसरावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.
परिसरात सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाले होते. रणजीत हा आपल्या आई-वडिलांसोबत शेतात काम करत होता. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. याच दरम्यान अंगावर वीज कोसळल्याने रणजीतचा जागीच मृत्यू झाला.
रणजीत हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा व अविवाहित होता. त्याच्या अशा अचानक जाण्याने पाटील कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील आणि दोन बहिणी असा परिवार आहे.
जोरदार पाऊस सुरू झाल्याने आई-वडील घराच्या दिशेने पुढे चालत होते, तर रणजीत त्यांच्या पाठोपाठ येत होता. दोघांमध्ये जेमतेम काही अंतराचा फरक असतानाच, कानठळ्या बसवणाऱ्या आवाजासह विजेने रणजीतवर घाला घातला. आपल्या डोळ्यांदेखत काळजाच्या तुकड्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याचे पाहून आई-वडिलांनी जागेवरच हंबरडा फोडला.