हमीदवाडा : मूळ क्षेत्र मेतके (ता. कागल) येथे बाळूमामांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गाडी फोडून सुमारे 40 तोळे सोन्याचे दागिने अज्ञातांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. दरम्यान या घटनेचा तपास मुरगूड पोलिस करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत फॉरेन्सिक लॅबच्या कर्मचार्यांना बोलवून हा तपास सुरू होता.
याबाबतची अधिक माहिती अशी, मूळ देवगड येथील व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले वेदांत विजयकुमार धुमाळ, त्यांची आई, विवाहित बहीण व तिचा पती व आणखी एक बहीण असे पाचजण मेतके येथे दर्शनासाठी आले होते. सायंकाळी सहाच्या दरम्यान त्यांनी अगोदर मूळ मंदिरात दर्शन घेतले व नंतर ते गलगले रस्त्याला असलेल्या बाळूमामा-सत्यवा देवी जोड मंदिरात दर्शनासाठी गेले. यावेळी गाडी मंदिराच्या नजीकच रस्त्याकडेला पार्क करून हे सर्व मंदिरात गेले होते. तिथे दर्शन घेऊन बाहेर गाडीजवळ (एमएच 14 केएन 8810) येताच पाठीमागील काच फोडून आत ठेवलेली दागिन्यांची बॅग पळवल्याचे लक्षात आले.
या भविकांमधील धनकवडी (पुणे) येथील अक्षय निखिल बेंद्रे यांचा 3 फेब्रुवारी रोजी विवाह झाला आहे. त्यामुळे पत्नीसह ते दर्शनास आले होते व लग्नविधी फुलेवाडी येथे तात्पुरत्या घेतलेल्या घरात झाले व तिथे कोणी परिचित नसल्याने घर बंद करून येताना सर्व दागिने बॅगमधून सोबतच आल्याचे धुमाळ व बेंद्रे यांनी सांगितले. दरम्यान रात्री उशिरापर्यंत सहायक पोलिस निरीक्षक शिवाजीराव करे व त्यांचे सहकारी चौकशी, सीसीटीव्ही व फॉरेन्सिक लॅबच्या माध्यमातून तपास करीत होते.