Duplicate Bill Fraud | बडिशेप 17 रुपये किलो... जिरे 102 रुपये, तर मोहरी 10 रुपये किलो Pudhari File Photo
कोल्हापूर

Duplicate Bill Fraud | बडिशेप 17 रुपये किलो... जिरे 102 रुपये, तर मोहरी 10 रुपये किलो

कर चुकविण्यासाठी व्यापार्‍याने लढविली शक्कल

पुढारी वृत्तसेवा

विकास कांबळे

कोल्हापूर : बडिशेप 17 रुपये किलो... जिरे 102 रुपये किलो, तर मोहरी 18 रुपये किलो हे दर बाजारातील नव्हे, तर सेस चुकविण्यासाठी व्यापार्‍यांनी लढविलेली शक्कल आहे. मसाल्याचे दर गगनाला भिडले असताना व्यापार्‍यांनी डुप्लिकेट बिलावर दाखविलेल्या या रकमेमुळे व्यापार्‍यांची फसवेगिरी उघड झाली आहे.

शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, त्यांची व्यापार्‍यांकडून फसवणूक होऊ नये म्हणून राज्यात बाजार समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. व्यापार्‍यांकडून मिळणारा सेस हेच बाजार समित्यांचे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे हा कर व्यापार्‍यांनी प्रामाणिकपणे भरावा, अशी अपेक्षा बाजार समिती प्रशासनाची असते; परंतु अलीकडील काळात कर चुकवेगिरीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते.

बाजार समितीच्या सभापतिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सूर्यकांत पाटील यांनी अशा कर चुकवेगिरीला आळा घालण्याची भूमिका घेतली आहे. आतापर्यंत गेल्या चार महिन्यांत चार मोठ्या कारवाया करण्यात आल्या. त्यामध्ये कर्नाटकात तयार झालेला गूळ मार्केट यार्डमध्ये आणून त्यावर मार्केट यार्डचे लेबल लावून विकण्यात येत असल्याचे गंभीर प्रकरण उजेडात आले. याशिवाय बाजारातील वस्तूची मूळ किंमत आणि बाजार समितीला दाखविण्यासाठी केलेले बिल यामध्ये प्रचंड तफावत असल्याचे उघडकीस आले आहे.

बाजारामध्ये चिमुटभर बडिशेप असणार्‍या पुडीची किंमत पाच रुपये आहे. मार्केट यार्डमधील एका ‘हसमुखलाल’ व्यापार्‍याने कर चुकविण्यासाठी चांगलीच शक्कल लढविली आहे. सध्या बाजारात बडिशेपचा दर प्रतिकिलो दर 450 ते 500 रुपये असताना या व्यापार्‍याने एक किलो बडिशेपची किंमत फक्त 17 रुपये दाखविली आहे. जिर्‍याचे दर तर सर्वांनाच माहीत आहेत. जिर्‍याचे दर सध्या 300 ते 400 रुपये प्रतिकिलो असे आहेत. बाजार समितीला कर भरण्यासाठी या व्यापार्‍याने दिलेल्या मालाच्या पावतीवर 120 रुपये किलो असा दर लावला आहे. मोहरीचा दर तर विचारूच नका. मोहरीचा दर 100 ते 120 रुपये असताना या व्यापार्‍याकडे ती केवळ 18 रुपये किलो मिळते. कर चुकविण्यासाठी व्यापार्‍यांनी लढविलेली ही शक्कल सध्या बाजार समितीत चर्चेचा विषय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT